चिखली बसस्थानक

चिखली बसस्थानकाच्या मुख्य गेटवर खड्डा; प्रवासी आणि एसटी चालक त्रस्त

Chikhli Bus Station Pothole: महत्त्वाचे बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मोठा खड्डा पडल्याने प्रवासी, पादचारी तसेच बसचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे

चिखली बसस्थानकाच्या मुख्य गेटवर खड्डा; प्रवासी आणि एसटी चालक त्रस्त

Chikhli Bus Station Pothole

 

मुख्य प्रवेशद्वारासमोरच घाणीचे साम्राज्य; निचरा व्यवस्था ठप्प, तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

चिखली (Chikhli Bus Station Pothole) : बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील महत्त्वाचे बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मोठा खड्डा पडल्याने प्रवासी, पादचारी तसेच एसटी महामंडळाच्या बसचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यात साचलेले पाणी, चिखल आणि घाणीमुळे मुख्य गेटमधून ये-जा करणे धोकादायक बनले असून, वारंवार तक्रारी करूनही अद्याप या समस्येवर ठोस उपाययोजना झालेली नाही.

चिखली शहर हे दोन प्रमुख राज्य महामार्गांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथील (Chikhli Bus Station) बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने एसटी बसेस तसेच प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने या वर्दळीच्या ठिकाणीच गैरसोयीचे चित्र निर्माण झाले आहे. मोठ्या खड्ड्यामुळे एसटी बस चालकांना बसस्थानकात प्रवेश करताना तसेच बाहेर पडताना वाहने सावधपणे चालवावी लागत आहेत.

पादचारी आणि दुचाकीस्वारांनाही धोका
मुख्य गेटसमोरील खड्ड्यामुळे (Chikhli Bus Station Pothole) पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांचीही मोठी गैरसोय होत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्यानंतर त्याची खोली लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होतो. त्याचबरोबर चिखल आणि घाणीमुळे परिसरात अस्वच्छता पसरत आहे. खड्ड्यांतून वाहने ने-आण करताना वाहनांचे नुकसान होण्याची शक्यताही वाढली आहे.

निचरा व्यवस्था ठप्प; बसस्थानकातील पाणी मुख्य गेटमधून बाहेर
बसस्थानक परिसरातील पावसाचे व इतर सांडपाणी वाहून जाण्यासाठी पूर्वी असलेली निचरा व्यवस्था आता प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे दिसून येते. पूर्वीच्या वहिवाटीचा नाला बंद पडल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी बसस्थानकाच्या आवारातील पाणी मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर पडत असल्याने गेटसमोर खड्डा पडून त्यात पाणी व चिखल साचत आहे. या समस्येवर केवळ खड्डा बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी न करता पाण्याच्या कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा-पुन्हा रस्ता खराब होण्याची शक्यता आहे.

आगार व्यवस्थापकांकडे तक्रार, तरीही कारवाईची प्रतीक्षा
मुख्य गेटसमोरील या गंभीर समस्येबाबत आगार व्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, तक्रारीनंतरही अद्याप प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू झालेले नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकासारख्या सार्वजनिक आणि सतत वर्दळीच्या ठिकाणी मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चिखली बसस्थानक (Chikhli Bus Station) हे एसटी महामंडळाच्या अखत्यारित असले तरी येथे दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य प्रवेशद्वारासमोरील खड्डा तातडीने बुजविण्यासोबतच निचरा व्यवस्थेची पाहणी करून बंद पडलेला नाला कार्यान्वित करणे गरजेचे आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.