गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
चिखली (Chikhli Seva Sankalp Mission) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून डी.पी. रोड, बाबू लॉज चौक, राजा टॉवर ते रेणुका देवी परिसरापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासह कचरा योग्य ठिकाणी टाकून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
माजी सैनिकांचा सन्मान
देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर कर्तव्य बजावून राष्ट्रसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा यावेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच शहराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज परिश्रम घेणाऱ्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी भगिनी-बंधूंचेही यावेळी कौतुक करण्यात आले. (Chikhli Seva Sankalp Mission) स्वच्छ व सुंदर शहर ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, यातूनच स्वच्छ चिखलीचा संकल्प साकार होईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील, मुख्याधिकारी प्रशांतजी बिडगर, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, सुरेंद्रप्रसाद पांडे, कपिलदादा खेडेकर, शहराध्यक्ष सागर पुरोहित, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर, गटनेते अमोल खबुतरे, आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर, नगरसेविका अश्विनी जाधव, बाळू जाधव यांच्यासह नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.