मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कारवार्ई अपेक्षीत
हिंगोली (Hingoli Contractual Employees) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मनुष्यबळ पुरविणार्या खासगी संस्थेचा कारभार दलालांनी हातात घेतल्यामुळे कर्मचार्यांची मोठी पिळवणूक होत असल्याची चर्चा आहे. दोन वर्षापासून हिंगोलीत सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कंंत्राटी कर्मचारी पुरविण्याचे काम पुणे येथील एका खासगी संस्थेला मिळालेले आहे. यापूर्वी कर्मचार्यांची भरती होत असताना कंपनीचे अधिकारीच भ्रष्टाचार करीत असल्याच्या मोठ्या तक्रारी झाल्या होत्या. त्यावेळी कंपनीने काही अधिकार्यांच्या बदल्या केल्या. आता पुन्हा मेडीकल कॉलेजमध्ये कर्मचार्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
कंत्राटी स्वरूपात घेतल्या जाणार्या या कर्मचार्यांकडून एकुण पगाराच्या पंचवीस ते पन्नास टक्के रक्कम दलालांच्या घशात जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या बाबत एका पिडीताने जिल्हाधिकार्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. विशेष म्हणजे या कंपनीकडे राज्यातील अनेक शासकीय व निमशासकीय महाविद्यालये तसेच इतर संस्थाना मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळालेले आहे. कंपनीचे अधिकारी - कर्मचारी स्थानिक दलालांना हाताशी धरून कंत्राटी कर्मचारी भरती करीत असुन त्यामध्ये पंचवीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत रक्कम दलालामार्फत घेतली जात असल्याची माहिती आहे.
पुर्वी पासून कार्यरत असलेल्या काही कर्मचार्यांनी या माहितीला दुजोरा दिला असला तरी नौकरी जाण्याच्या भितीने उघडपणे समोर यायला कोणीच तयार होत नसल्याचे चित्र आहे. सदर प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.