‘डीआरआय' नागपूर पथकाची धडक कारवाई
देवरी/ गोंदिया (Deori Leopard Skin Seized) : वन्यजीव तस्करीच्या विरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर प्रादेशिक युनिटने देवरी परिसरात मोठी कारवाई करत बिबट्याची कातडी जप्त केली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई २९ सप्टेंबर रोजी देवरी–पुराडा मार्गावरील मोहनटोला शिवारात करण्यात आली. धनराज रामलाल उईके (३५) रा.ढिवरीनटोला, ता.देवरी आणि नीलकंठ रामचंद्र पंधरे (३७) रा.श्रीरामनगर, ता. सडक अर्जुनी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईमुळे पूर्व विदर्भातील वन्यजीव तस्करांचे धाबे दणाणले असून वनवर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवरी परिसरात (Deori Leopard Skin Seized) बिबट्याच्या कातडीचा गुप्त व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती नागपूर डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने देवरी–पुराडा मार्गावरील मोहनटोला परिसरात सापळा रचला. संशयित हालचालींवरून पथकाने धनराज उईके व नीलकंठ पंधरे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी केली. त्यांच्याकडे असलेल्या एका पांढर्या कापडात अत्यंत काळजीपूर्वक गुंडाळून ठेवलेली पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याची कातडी आढळून आली. पथकाने स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करून कातडीसह संबंधित मुद्देमाल जप्त केला.
या (Deori Leopard Skin Seized) कारवाईनंतर आता संपूर्ण प्रकरणाचा तपास वन विभागाकडे आला आहे. ही कातडी मिळविण्यासाठी बिबट्याची शिकार देवरी, नवेगावबांध की छत्तीसगडच्या जंगलात झाली? ही कातडी या दोघांकडे कोणी सुपूर्द केली आणि ती पुढे नागपूरसह कोणत्या मोठ्या शहरात विकली जाणार होती? यामागे एखादी आंतरराज्यीय वन्यजीव तस्करांची मोठी टोळी सक्रिय आहे का, या दिशेने वन विभागाकडून तपास चक्रे फिरवली जात आहेत. या कारवाईमुळे देवरी परिसरातील जंगलांमधील शिकारींचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकरण उत्तर देवरी वनविभागाच्या स्वाधीन
बिबट्या हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची-१ मधील सर्वोच्च संरक्षित प्राणी असून, त्याचे अवयव बाळगणे, विक्री करणे किंवा वाहतूक करणे हा अजामीनपात्र गंभीर गुन्हा आहे. डीआरआयच्या पथकाने प्राथमिक कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर जप्त केलेली कातडी, संबंधित कागदपत्रे आणि दोन्ही संशयित आरोपींना पुढील सखोल कारवाईसाठी उत्तर देवरी वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.