पती गंभीर जखमी; तहसील कार्यालयासमोरील घटना
देवरी/ गोंदिया (Deori truck accident) : बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना एका हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. देवरी शहरातील तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघातात २४ वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. ही (Deori truck accident) घटना आज १० सप्टेंबर रोजी सायंकाळी दरम्यानची आहे. ज्योती रुपेश दर्रो (२४) रा. दर्रोटोला/भर्रेगाव, ता. देवरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर रुपेश कन्हैयालाल दर्रो (२९) हे गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर असे की, पोळा सणानिमित्त रुपेश दर्रो हे आपल्या पत्नीसह सणाचा आनंद घेण्यासाठी व बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकी क्रमांक MH 35 AY 1409 ने घराबाहेर पडले होते. देवरी शहरातील तहसील कार्यालयासमोरील (Deori truck accident) राष्ट्रीय महामार्गावरून ते दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पंपाच्या दिशेने जात होते. दरम्यान, समोरील दिशेने भरधाव व बेदरकारपणे येणाऱ्या ट्रक क्रमांक CG 07 BA 3067 ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दाम्पत्य रस्त्यावर दूर फेकले गेले. या अपघातात डोक्याला व शरीराला जबर मार लागल्याने ज्योती दर्रो यांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला. तर रुपेश दर्रो हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच देवरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि गंभीर जखमी रुपेश दर्रो यांना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या (Deori truck accident) प्रकरणी देवरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या निष्पाप दाम्पत्यावर काळाने असा घाला घातल्याने दर्रोटोला आणि भर्रेगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.