शेतकरी संकटात, घोषणांपलिकडे जाऊन मदत करा
लातूर (Dhiraj Deshmukh) : मराठवाड्यातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे. पावसा अभावी शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातात येणारा घासही आता हातातून निसटला आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घोषणांपलिकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी केली. लातूर जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर धीरज देशमुख लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पाणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
लातूर तालुक्यातील करकट्टा, माटेफळ शिवारात भेट देत धिरज देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. यंदा पावसाने ओढ दिल्याने तसेच प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे केवळ हिरवे पालवे दिसत असून शेंगा भरलेल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरसकट नुकसान झाले असताना शासनाने तातडीने मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे (Dhiraj Deshmukh) देशमुख यांनी सांगितले.
कर्जमाफीची घोषणा झाली, अनुदान देण्याची घोषणा झाली. काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अंशतः लाभ मिळाला असेल; मात्र सध्याच्या पीक नुकसानीमुळे तो आधारही अपुरा ठरणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे, असे (Dhiraj Deshmukh) धिरज देशमुख यांनी स्पष्ट केले.
लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने अनुदान किंवा विशेष मदतीचे पॅकेज जमा केले, तर या संकटाच्या काळात त्यांना मोठा आधार मिळू शकतो. शेतकऱ्यांवर एकीकडे नैसर्गिक संकट आलेले असताना दुसरीकडे शासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे, अशी खंत धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी व्यक्त केली.
एक रुपयात पीक विम्याची घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्ष लाभ मिळताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पीक विम्याच्या निकषांमध्ये पारदर्शकता आणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. जिओ-ट्रेकिंगसारख्या तांत्रिक प्रक्रियांच्या नावाखाली शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये. नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळणे महत्त्वाचे आहे, असेही (Dhiraj Deshmukh) धिरज देशमुख यांनी सांगितले.
मागील वर्षाची मदत अद्याप मिळाली नाही
गेल्या वर्षी लातूरसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पीक विमा, अतिवृष्टीचे पॅकेज आणि इतर माध्यमातून मदत जाहीर करण्यात आली; मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. आता पुन्हा यंदाचे पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.