हल्लेखोरांवर गुन्हे दाखल!
मानोरा (Environmentalist Ramesh Pawar) : तालुक्यातील रतनवाडी, धोनी परिसरात आयसीसी (आयससी) कंपनीकडून सुरू असलेल्या अवैध टेकडी उत्खननाविरुद्ध लढा देणारे ७८ वर्षीय ज्येष्ठ पर्यावरणवादी रमेश पवार यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. वाढता दबाव आणि तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी हल्लेखोर रामपाल थानसिंग मांजरते व त्याची पत्नी अनुसया रामपाल मांजरते यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ११५(२), १२६(२), २९६, ३(५), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले आहे.
रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी आयसीसी कंपनीच्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. यावरून २७ ऑगस्ट रोजी महसूल आणि गौण खनिज विभागाच्या पथकाने रामपाल मांजरते यांच्या शेतात छापा टाकून अवैध उत्खनन करणारे २ जेसीबी व ४ टिप्पर पकडून पंचनामा केला होता. याच कारवाईचा राग मनात धरून १४ सप्टेंबर रोजी दुपारी पाळोदी ते शेंदुर्जना मार्गावरील धोनी येथे रामपाल थानसिंग मांजरते आणि अनुसया रामपाल मांजरते यांनी पवार यांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली.
पवार (Ramesh Pawar) यांनी "माझ्यावर झालेला हा हल्ला आयसीसी कंपनीच्या इशाऱ्यावरूनच झाला आहे. माझा लढा केवळ या हल्लेखोरांशी नसून, भ्रष्ट आयसीसी कंपनी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल विभागाविरुद्ध आहे," असा खळबळजनक आरोप स्वतः त्यांनी केला आहे. प्रशासनाने केवळ मोहरा असलेल्या हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून न थांबता, यामागचे मुख्य सूत्रधार असलेल्या आयसीसी कंपनीवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसे न झाल्यास जनतेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा खणखणीत इशारा देण्यात आला आहे.