हिंगोली एसीबी पथक कारवाई

हिंगोलीतील एसीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांची नांदेडमध्ये कामगिरी; लाच घेताना दोघांना पकडले

Hingoli ACB Squad Action: पेट्रोल पंपासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले..

हिंगोलीतील एसीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांची नांदेडमध्ये कामगिरी; लाच घेताना दोघांना पकडले

Hingoli ACB Squad Action

हिंगोली (Hingoli ACB Squad Action) : पेट्रोल पंपासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागून १ लाख २० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी भाग्यनगर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुकेश भिमराव नहारे  पद - कनिष्ठ लिपिक, गट-क, राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालय, नांदेड) आणि सतीश मधुकर वाघोळे, खाजगी नोकरी, पारवे कन्सल्टंट) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय तक्रारदार यांची मौजे इस्लामपूर, ता. किनवट, जि. नांदेड येथील गट क्रमांक ८७ मध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा पेट्रोल पंप सोडत प्रक्रियेतून २०२४ मध्ये निवड झाली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी कागदपत्रे सादर केली होती. वारंवार त्रुटी काढल्या जात असल्याने कनिष्ठ लिपिक सुकेश नहारे यांना काम लवकर करण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी खाजगी इसम वाघोळे यांच्यामार्फत करण्यात आली.

तक्रारदाराने ३० सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. १ ऑक्टोबर रोजी पडताळणीत अडीच लाख रुपयांची मागणी निष्पन्न झाल्याने दुपारी १२.३६ वाजता सापळा रचून १,२०,००० रुपयांची लाच स्वीकारताना सतीश वाघोळे याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाणे, नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही (Hingoli ACB Squad Action) कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरे यांच्या पथकाने केली. या पथकात हिंगोली येथील एसीबी पथकातील पोहेकॉ गजानन पवार, पोशि मारुती मुलगीर, पोलीस अंमलदार अमोल जाधव, विनोद पुंडगे, सय्यद खदीर, विनय नुकलवार आणि चालक पोहेकॉ अकबर शेख यांचा समावेश होता.