कळंबा पाटी जवळील भिषण अपघात; हट्टा आरोग्य केंद्रात दोघांचे तर परभणी रुग्णालयात दोघांचे मृतदेह
अपघातात औंढा ना. येथील मायलेकीचा मृत्यू
हिंगोली/हट्टा/आडगाव रंजेबुवा (Hingoli Accidental Death) : वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या ऑटोच्या भिषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या बाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ येथून ऑटो क्रमांक एम.एच.२२ ए.पी. २१४९ यामधून काही प्रवाशी ७ सप्टेंबर रोजी प्रवास करीत होते. सदरील ऑटो परभणीकडे निघाला असताना औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर कळंबा पाटीजवळ दुपारच्या सुमारास एका भरधाव वेगातील वाहनाने ऑटोला धडक दिल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो रस्त्याच्या खाली उलटला. ऑटो उलटल्यानंतर एकच आरडा ओरड काही ग्रामस्थांना ऐकावयास मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेला तात्काळ बोलावून घेतले. ऑटोमधील गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.
यामध्ये आदवीका संदिप साळवे रा. औंढा नागनाथ या दिड वर्षाच्या चिमुकलीसह ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने या दोघांचे मृतदेह हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. उर्वरित गंभीर जखमीना परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रज्ञा संदिप साळवे (३०) रा. औंढा नागनाथ,अर्चना संभाजी थोरात (३५) रा. गुरापिंपरी ता. घनसावंगी जि. जालना यांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमी सुरेश दत्तराव जाधव रा. जोडजवळा ता. वसमत, रेखा रणखांबे, ओंकार रणखांबे, समिरखॉन,साई संभाजी थोरात हे जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात चौघांचा मृत्यू तर पाचजण जखमी झाले आहेत.
या (Hingoli Accidental Death) अपघातासंदर्भात रात्री उशीरापर्यंत हट्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. घटनास्थळी हट्टा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप बोरकर, पोलिस उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार हिरामन चव्हाण, कृष्णा चव्हाण यांनी भेट दिली. दरम्यान अपघातातील ११ वर्षीय मुलाची ओळख पटली नसल्याने पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.अपघातातील जखमींना १०८ रुग्णवाहिकेतील राजेश जाधव, डॉ.कपील शिंदे यांनी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघातातील वाहनाचा शोध सुरु
वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ दुपारच्या सुमारास ऑटोला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौघांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाल्याने त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऑटोला ज्या वाहनाने धडक दिली त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यानिमित्त या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेजही तपासले जात आहेत.