हिंगोली (Hingoli Collector Office) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे. 15 ऑगस्ट निमित्ताने संपूर्ण इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
इमारतीच्या खालच्या भागाला हिरव्या रंगाची, वरच्या भागाला भगव्या आणि पांढऱ्या रंगाची लाईट लावण्यात आली आहे. त्यावर गुलाबी, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या लड्यांनी सजावट केल्याने संपूर्ण इमारत तिरंग्यासारखी दिसत आहे. प्रवेशद्वारावर "मध्यवर्ती प्रशासकीय इमारत" या नावाच्या पाटीभोवतीही विशेष लाईट लावण्यात आल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणारा स्ट्रीट लाईट आणि आजूबाजूची झाडे या रोषणाईमुळे अधिकच उठून दिसत आहेत.
प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्यदिन अधिक उत्साहात साजरा व्हावा यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इमारतीवर काम सुरू होते आणि आता अंतिम रूप देण्यात आले आहे. संध्याकाळी कार्यालय परिसरातून जाणारे नागरिक आणि तरुण या सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय हीच जिल्ह्याची मानबिंदू इमारत आहे. तिरंग्याच्या रंगात ती उजळल्याने देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार असून त्याआधीच रोषणाईमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे. एकूणच हिंगोलीकरांसाठी हा स्वातंत्र्यदिन अधिक संस्मरणीय होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.