हिंगोली शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी कामगिरी
हिंगोली (Hingoli Ganja seized) : शहर पोलीसांनी एनटीसी कमानीजवळ अवैध गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार्या ७५ वर्षीय इसमाला अटक करून त्याच्याकडून ८ किलो १३५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत २ लाख ३ हजार ३७५ रुपये असून एक मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलीस उपनिरीक्षक युवराज जयवंत राव वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजून ५ मिनिटांनी एनटीसी कमानीजवळ मौलाखान वाहबखान पठाण वय ७५ वर्षे राहणार मस्तानशहानगर हिंगोली हा शासनाने उत्पादनास व विक्रीस प्रतिबंधित असलेला गांजा अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने बॅगमध्ये घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले.
झडती दरम्यान त्याच्या ताब्यातील तापकिरी रंगाच्या बॅगेतून गांजा आढळून आला. वजन केले असता ८ किलो १३५ ग्रॅम गांजा आढळला. प्रति किलो २५ हजार रुपये प्रमाणे एकूण २ लाख ३ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल आहे. याशिवाय त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज वाघमारे यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा कलम २० ब २ आणि ८ अ एनडीपीएस कायदा १९८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दि. ११ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी पूर्ण झाली.
कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायणराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस हवालदार सुनील अंभोरे, मोहसिन शेख, अमजत शेख, दिलीपकुमार लेकुळे आणि लोणकर यांच्या पथकाने केली.आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेला गांजा कोठून आणला आणि त्याचे इतर साथीदार कोण आहेत याचा देखील तपास केला जात आहे. पुढील तपास सपोनि आनंद बनसोडे हे करीत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह हिंगोली शहर पोलिसांनी सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून गांजा जप्त करून तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये तिघांनाही जेरबंद केले आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष ठेवणे, माहिती गोळा करणे आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करणे हे ज्यांचे प्रमुख काम आहे, त्या स्थानिक गुन्हे शाखेला या दोन्ही प्रकरणांची कुठलीही पूर्वसूचना नसल्याचे समोर आले आहे.
शहर पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करता येते, मग जिल्हाभर जाळे असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला या गांजाच्या साठ्याबद्दल माहिती का मिळाली नाही, असा सवाल आता नागरिक आणि पोलीस वर्तुळातही उपस्थित होत आहे. गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती संकलन यंत्रणा किती सक्रिय आहे, याची तपासणी करण्याची गरज आहे.
हिंगोली शहर पोलिसांची सलग दोन दिवस कामगिरी अंमली पदार्थ गांजा (Hingoli Ganja seized) विरोधात हिंगोली शहर पोलिसांची सलग दोन दिवस कामगिरी झाली आहे. १० ऑगस्टला जिल्हा परिषद मैदानावर १ किलो ३५० ग्रॅम गांजा जप्त करून ओम गजानन पवार रा. कांचन नगर हिंगोली, शेख तौफीक उर्फ लाला शेख मुस्तफा रा. अष्टविनायक नगर हिंगोली या दोघांना अटक केली असुन ते १२ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. या पाठोपाठ ११ ऑगस्टला मध्यरात्री पथकाने छापा मारून मौलाखान वहाबखान पठाण रा. मस्तानशहा नगर हिंगोली याच्याकडून २ लाख ३ हजार ३७५ रुपयाचा ८ किलो १३५ ग्रॅम गांजा जप्त केला. सलग दोन दिवस कामगिरी करून गांजा जप्त केल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी शहर पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले आहे.