हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना
चौघाविरुध्द हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli police assault case) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला गाडीवर दंड आकारल्याच्या रागातून लोखंडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार कपील संजय जाधव हे शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ते सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासकीय कर्तव्यावर हजर असताना ही घटना घडली.
आरोपी प्रमोद प्रल्हाद मांडगे, सतीष सुरेश पडोळे, शाम साबळे आणि शिवशंकर उर्फ बाबा सुभाष दराडे यांनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच प्रमोद मांडगे याने गाडीवर फाईन का मारली असे म्हणत हातातील लोखंडी काठीने फिर्यादीच्या डोळा, तोंड, छाती आणि पोटावर मारहाण करून जखमी केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि वाघमारे हे करीत आहेत.
हिंगोली शहरामध्ये वाहतुक नियमाचे उल्लंघन (Hingoli police assault case) करणार्या वाहनांवर प्रत्येक दिवशी दंडात्मक कारवाईचे सत्र सुरु आहे. २२ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासकीय कर्तव्यावर असलेले शहर वाहतुक शाखेचे कपील जाधव यांना मारहाण केल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आला. सदर प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला.