जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिल्या सूचना
हिंगोली (Hingoli School Administration) : हिंगोली जिल्ह्यात अल निनोच्या प्रभावामुळे अद्याप पाऊस झालेला नाही आणि उष्णतेची तीव्रता कायम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश दिले आहेत.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या हिंगोली जिल्हाध्यक्ष व्ही. डी. देशमुख आणि जिल्हा सरचिटणीस हरीभाऊ मुटकुळे यांनी 22 जून रोजी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आज आदेश काढला.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी यांना पाठवलेल्या आदेशानुसार, (Hingoli School Administration) मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा सकाळी 8.00 ते दुपारी 12.30 या वेळेतच सुरू राहतील. शैक्षणिक सत्र 2026-27 साठी 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी पाऊस न झाल्याने उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना नवीन वेळापत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.