पातूर (Zilla Parishad Urdu School) : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या चार वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झाल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी शाळेच्या तीन वर्गखोल्यांवरील टिनपत्रे व छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधित विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने विद्यार्थी धोकादायक अवस्थेतील वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेण्यास भाग पडत आहेत.
जीर्ण इमारतीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून आवश्यक दखल घेतली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांची अवस्था अधिकच धोकादायक बनत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक व पालकांनी शाळेच्या वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित मंजुरी देऊन दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही पालकांनी दिला आहे.
प्रतिक्रिया :
खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या (Zilla Parishad Urdu School) दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षांपूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे ६ लाख ३० हजार रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळताच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.
-जहूर खान, सरपंच, खेट्री
जिल्हा परिषद उर्दू शाळा
जि.प. उर्दू शाळेच्या चार वर्गखोल्या जीर्ण खेट्रीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Zilla Parishad Urdu School: जि.प. या उर्दू शाळेच्या वर्गखोल्यांचे दोन वर्षापासून दुरस्ती करण्याच्या मागणीत आले आहे. अटळलेल्या अवस्थामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका होतो,
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Zilla Parishad Urdu School