1 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त; 5 जणांवर गुन्हा दाखल
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांना जुगाराची मिळाली होती गोपनीय माहिती
कळमनुरी (Kalamnuri Gambling raid) : कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतील वाकोडी येथील शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 4 जुगाऱ्यांसह एका अनोळखी इसमावर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 1,07,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास वाकोडी येथील किरण सुभाष काकडे यांच्या शेतातील लाकडाच्या मांडवामध्ये करण्यात आली. काहीजण पत्त्यावर पैशाची बाजी लावून 'झन्ना मन्ना' या नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांना मिळाल्याने त्यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्यासह नियंत्रण कक्षातील सपोनि रामदास महाजन निरदोडे यांच्यासह पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना केले.
या (Kalamnuri Gambling raid) छाप्यात पोलिसांनी गजानन राघोजी डाखोरे, रा. शेंबाळ पिंपरी ता. पुसद जि. यवतमाळ, रामराव सोनबा काकडे, रा. गंगापूर ता. कळमनुरी जि. हिंगोली, संतोष बळीराम काठोळे,रा. शेंबाळ पिंपरी ता. पुसद, किरण सुभाष काकडे, रा. वाकोडी ता. कळमनुरी यासह एक अनोळखी इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींकडून एकूण 37,950 रुपये रोख, 20 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल 50 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (MH 29 BE 7833) असा एकूण 1,07,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात पुढील तपास ग्रेड पोउपनि मदन गव्हाणे हे करीत आहेत.