कळमनुरी (Kalamnuri Water Supply Centre) : कळमनुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इसापूर धरण येथील मुख्य पाणी पुरवठा केंद्राची व कडपदेव येथील पंप हाऊसची आज नगराध्यक्ष प्रतिनिधी आर. आर. पाटील व उपनगराध्यक्ष शिवराज पाटील यांनी पाहणी केली.
शहराचा पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला होता. पंप हाऊस येथील स्टार्टर खराब झाल्याने पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खराब झालेल्या स्टार्टरच्या दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
सदरील दुरुस्तीचे काम आज पूर्ण होणार असून, उद्या सकाळपासून शहराच्या काही भागात पाणी पुरवठा (Kalamnuri Water Supply Centre) सुरू केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक, नगरसेवक बबलू भाऊ पत्की, अभियंता निकेत येरमाळ, पाणी पुरवठा अभियंता बळवंते साहेब यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.