दिशा समितीच्या बैठकीत निर्णय; राज्य व केंद्र सरकारला काकडे!
लातूर (Latur District Drought) : लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) दिशा समितीच्या बैठकीत लातूर जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आमदार अमित देशमुख यांनी हा ठराव मांडला त्याच आमदार विक्रम काळे यांनी अनुमोदन दिले. राज्य सरकारने याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि केंद्र सरकारने राज्याला याबाबत भरीव मदत करावी, अशी मागणी या ठरावात करण्यात आली.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, अशासकीय सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील दुष्काळसुदृश्य परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा, चारा छावण्या, रोजगार हमीची कामे या संदर्भाने उपाययोजनांची आखणी करावी यासह महत्त्वाच्या सूचना यावेळी आमदार देशमुख यांनी या बैठकीदरम्यान केल्या आहेत. पीक विमा योजनेत पारदर्शकता आणावी, त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, पिकाची नुकसान लक्षात घेऊन भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सध्या पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने कृषी विभागाने तत्काळ अहवाल तयार करून शासनाकडे पाठवावा आणि पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करून नुकसानीची अचूक नोंद करावी, अशा सूचनाही खासदार डॉ. काळगे यांनी यावेळी दिल्या. यावर्षी जिल्ह्यातील एकही गाव स्मशानभूमीविना राहू नये, यासाठी व्ही. बी. जी. राम जी आणि जिल्हा वार्षिक योजनेतून कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार विक्रम काळे यांनी यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या. तसेच योजनांच्या अंमलबजावणीविषयी संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले.
'मांजरा'तील पाणी उपसा रोखण्यासाठी पथक!
आगामी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक गावात व्ही. बी. जी. रामजी योजनेतून किमान एकतरी काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता अवैध पाणी उपसा रोखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका, महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त पथक स्थापन करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा त्यांनी दिल्या.