लातूर (Latur Municipal Protest) : लातूर शहर महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतन व सेवानिवृत्ती वेतन नियमित अदा करण्यात यावे, याकरिता शासनाकडून जीएसटी अनुदान वाढवून मिळावे. लातूर शहर महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे व सेवानिवृत्ती वेतन धारकांच्या 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.10) लातूर शहर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने धन्य आंदोलन करण्यात आले. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत संघटनेच्या वतीने 7 आगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यापासून बरेच निवेदने देण्यात आलेली आहेत. त्यानुषंगाने दि.29/06/2026 सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी धरणे आंदोलन केले होते. त्यासंदर्भात आयुक्त, उपायुक्त, स्थायी समिती सभापती, गटनेते, विरोधी पक्षनेते व इतर सदस्य यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर आदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केल्यावरुन धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
मात्र त्यानंतरही संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. (Latur Municipal Protest) संघटनेच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापुढे महापालिका आवारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवी कांबळे, उपाध्यक्ष बालाजी शिंदे, सचिव श्रीपाद सोनवणे, कोषाध्यक्ष अभिमन्यू पाटील यांनी दिला. आंदोलनात पालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.