अनेक अपघात होऊनही प्रशासन सुस्त; ‘आता तरी जागे व्हा!’ ग्रामस्थांचा सवाल
रमेश लांबोटे
निलंगा (Latur-Zahirabad Highway) : लातूर-जहीराबाद महामार्गावरील मिटूर मोड ते निटूर आणि पुढे मसलगा या मार्गावर वाहनांचा वेग दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. महामार्गावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक नसल्याने भरधाव वाहने सुसाट धावत असून, अपघातांची मालिका सुरू आहे. या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागल्यानंतरही प्रशासनाला जाग कधी येणार? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
अपघात (Latur-Zahirabad Highway) झाल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का? असा थेट सवाल नागरिकांनी केला असून, जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. निटूर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठेच्या मधूनच लातूर-जहीराबाद महामार्ग जात असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. बाजारपेठेत येणारे व्यापारी, ग्राहक, महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना भरधाव वाहनांच्या गर्दीतून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
पेट्रोल पंपांसमोरही वेगाला लगाम नाही!
निटूर येथील इंडियन ऑइल, एचपी आणि नायरा पेट्रोल पंपांसमोर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. तसेच निटूर बाजारपेठेत किमान दोन ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मिटूर मोडपासून मसलगा परिसरापर्यंत आवश्यक त्या प्रत्येक गावाच्या हद्दीत गतिरोधक उभारावेत, वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावावेत आणि अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘बळी गेल्यानंतरच उपाययोजना का?’
महामार्गावरील अपघात (Latur-Zahirabad Highway) रोखण्यासाठी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र अपघात घडल्यानंतर पंचनामे, मदत आणि आश्वासने देण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, अशी संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये आहे. आता आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार? असा सवाल करत निटूरसह महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांनी तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन त्वरित कार्यवाही न केल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.