दिवसा वीज देण्याची आणि बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची जोरदार मागणी
चिखली (Varkhed Leopard Terror) : तालुक्यातील वरखेड परिसरात बिबट्याचा वावर प्रचंड वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. पावसाने दिलेली ओढ आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे विहिरीतील उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व इतर पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. मात्र, महावितरण प्रशासनाकडून शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जात असल्याने, शेतकऱ्यांना स्वतःचा जीव मुठीत धरून भररात्री अंधारात शेतात जावे लागत आहे.
सुमारे ३० मिनिटे रोखून धरला रस्ता: सीसीटीव्हीत बिबट्या कैद
दिनांक २१ सप्टेंबर २०२६ च्या पहाटे १ ते १:१५ वाजेच्या सुमारास वरखेड येथील शेतकरी राजेश भगवान भगत हे आपल्या शेतातील सोयाबीन पिकाला पाणी देण्यासाठी जात होते. चिखली-वरखेड रस्त्यावर, गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या निकम साहेब यांच्या घराजवळ मुख्य रस्त्यावरच (Varkhed Leopard Terror) बिबट्याने भगत यांचा रस्ता अडवला. तब्बल ३० मिनिटे बिबट्या राजेश भगत यांच्यासमोर ठाण मांडून उभा होता. सुदैवाने, त्याच वेळी परिसरातील कुत्रे तेथे आल्याने बिबट्याचे लक्ष दुसरीकडे वेधले गेले आणि राजेश भगत यांना तेथून सुखरूप निसटण्याची संधी मिळाली.
दरम्यान, निकम साहेब यांच्या शेतातील घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या स्पष्टपणे कैद झाला आहे. या घटनेमुळे वरखेड आणि परिसरात बिबट्याचा वावर किती घातक पातळीवर पोहोचला आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
"आज जीव वाचला, उद्या हल्ला झाला तर जबाबदार कोण?"
आज राजेश भगत यांचा सुदैवाने जीव वाचला असला, तरी उद्या एखाद्या शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला तर त्याच्या कुटुंबाचे काय? असा संतप्त आणि आर्त सवाल वरखेडचे शेतकरी विचारत आहेत. शेती वाचवण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे, पण त्यासाठी जीवाचा खेळ करावा लागत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
महावितरण आणि वनविभागाकडे तातडीच्या मागण्या:
१. शेतीसाठी दिवसा वीज द्या: महावितरण प्रशासनाने वरखेड परिसरातील शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात बिबट्याच्या दहशतीत शेतात जावे लागणार नाही.
२. बिबट्याला तातडीने जेरबंद करा: वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात त्वरित पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करून ग्रामस्थांना भयमुक्त करावे.
"शेतकऱ्यांना पिकांसाठी वीज हवीच, पण त्याहून महत्त्वाचा शेतकऱ्याचा जीव आहे!" अशी ठाम भूमिका घेत समस्त वरखेड ग्रामस्थांनी महावितरण आणि वनविभागाला इशारा दिला आहे की, या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.