आधुनिक शेतकऱ्याच्या रूपातील गणपती बाप्पांचा जिवंत देखावा;
जांबुवंती नदीची व्यथा' आणि प्लास्टिक मुक्तीचा दिला परखड संदेश
चिखली (Mahatma Phule Ganesh Mandal) : धार्मिक उत्सवांना सामाजिक प्रबोधनाची जोड देऊन समाजाला जागरूक करण्याचे महान कार्य यंदा माळीपुरा येथील 'महात्मा फुले गणेश मंडळ, चिखली' हे दरवर्षी नित्यनेमाने करत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने अत्यंत संवेदनशील, वास्तववादी आणि समाजाचे डोळे उघडणारा देखावा सादर केला असून, तो संपूर्ण चिखली शहरात व परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
उत्सवाच्या काळात केवळ रोषणाई आणि देखावे न करता समाजातील ज्वलंत प्रश्नांवर बोट ठेवण्याचे काम या मंडळाने केले आहे. मंडळाने यंदा श्रींची मूर्ती एका 'आधुनिक शेतकऱ्याच्या' रूपात साकारली आहे. डोक्यावर फेटा, अंगात सदरा-धोतर आणि चेहऱ्यावर करुणामय भाव असलेला बळीराजाच्या रूपातील हा गणपती बाप्पा केवळ पूजेसाठी नसून मानवाला निसर्गधर्म व प्राणिमात्र दया शिकवण्यासाठी उभा ठाकला आहे असे चित्र पाहताच क्षणी जाणवते.
प्लास्टिकच्या कचऱ्याने मुक्या प्राण्यांचा घोटला जातोय श्वास!
देखाव्यामध्ये एक अत्यंत विदारक आणि हसऱ्या डोळ्यांना पाणावणारे दृश्य मांडण्यात आले आहे. देखाव्यात एक पांढरीशुभ्र गाय उभी असून तिच्या तोंडात प्लास्टिकची पिशवी अडकलेली दाखवली आहे. रस्त्यावर व उघड्यावर टाकाऊ टाकलेला कचरा आणि प्लास्टिक अन्नाच्या शोधात असलेले मुके प्राणी खातात आणि त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो.
इतकेच नाही तर, प्लास्टिक खाल्यामुळे गंभीर आजारी पडलेल्या आणि वेदनेने तडफडणाऱ्या वासराची तपासणी करताना गणपती बाप्पांचे वाहन असणारा 'मूषकराज' चक्क डॉक्टरच्या पेहरावात (मास्क, अंगात कोट आणि स्टेथॉस्कोप घालून) त्याच्यावर उपचार करताना दिसत आहे. हे दृश्य माणसाच्या बेजबाबदारपणाची आणि स्वार्थाची तीव्र जाणीव करून देते. बाप्पा स्वतः शेतकऱ्याच्या रूपात या मुक्या जनावरांना सावरताना आणि प्लास्टिकपासून वाचवताना दिसतात.
चिखलीची जीवनदायिनी जांबुवंती नदीची व्यथा'
मंडळाने केवळ प्राण्यांचाच विचार केला नसून शहराची जीवनदायिनी असलेल्या जांबुवंती नदी'च्या सद्यस्थितीवरही परखड भाष्य केले आहे.
"मी जांबुवंती नदी... चिखलीची जीवनदायिनी! कधीकाळी माझे पाणी स्वच्छ आणि निर्मळ होते... माझ्या काठावर आनंदाने जीवन फुलत होते. पण आज माझ्याच कुशीत प्लास्टिक, कचरा आणि घाण टाकली जाते... मी वाहतेय, पण माझे मन मात्र गुदमरतेय! मी तुमच्याकडे काही मोठे मागत नाही... फक्त एवढेच—माझ्यात कचरा टाकू नका! मला स्वच्छ ठेवा, मला जिवंत ठेवा... कारण मी फक्त नदी नाही, मी तुमच्या चिखलीची ओळख आहे!"
अशा शब्दांत जामुवंती नदीची आत्मकथा व तिची व्यथा फलकाच्या माध्यमातून मांडली आहे. नदीचे 'कालचे रूप' ( निर्मळ जलस्रोत व हिरवळ) आणि 'आजचे रूप' (प्लास्टिक व कचऱ्याचे साम्राज्य) यांचे तुलनात्मक फोटो दाखवून "याला जबाबदार कोण?" असा थेट प्रश्न नागरिकांच्या विवेकाला विचारण्यात आला आहे. महात्मा फुले गणेश मंडळ माळीपुरा, चिखली यांनी उभारलेला हा देखावा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता, प्रत्येक नागरिकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा ठरला आहे. हा देखावा पाहण्यासाठी चिखली शहर व परिसरातील नागरिकांनी, भाविकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली असून मंडळाच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.