शेंदुरजना गावातून रात्री-बेरात्री रस्ता बांधकाम कंत्राटदार कंपनीकडून गौण खनिजाची चोरटी अवैध वाहतूक सुरू!
मानोरा (Manora Revenue Administration) : तालुक्यातील शेंदुरजना - पोहरादेवी ते घोटा पांढरी सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे काम एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज मोठ्या प्रमाणात रात्री-बेरात्री चोरट्या पद्धतीने वाहतूक करून आणले जात आहे. महसूल प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
सोमवारी रात्री शेंदुरजना आढाव गावातून एक हायवा हा अवैध गौण खनिज वाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमाप्रमाणे गौण खनिज वाहतुकीसाठी रॉयल्टी पावती बंधनकारक असते, परंतु या कंपनीकडे कोणतीही रॉयल्टी पावती नसल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
दिवसा वाहतूक न करता रात्रीच्या अंधारात ही वाहतूक केली जाते. यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. या बाबत एका पर्यावरण प्रेमी तक्रारदारांनी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून या अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता तालुका महसूल प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.