मराठी बालकलावंतांनी जिंकली हैदराबादकरांची मने
नांदेड (International Balnatya Festival) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी पुनर्रचित केलेल्या 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' या पारंपरिक लोककथेच्या नाट्यरूपांतराचा प्रयोग हैदराबाद येथे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'रंगधारा'च्यावतीने सादर करण्यात आला. देशविदेशातील विविध बालनाट्यांसमवेत 'चल रे भोपळ्या'च्या मराठी भाषेतील प्रयोगाने हैदराबादकरांची मने जिंकली. अप्रतिम प्रयोग अशा शब्दात गौरव करत प्रेक्षकांनी बालकलावंतांचे कौतुक केले.
हैदराबाद येथे दिनांक २० ते २४ जुलै २०२६ च्या दरम्यान दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'रवींद्रभारती'मध्ये हा प्रयोग सादर करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश फडणीस यांनी रंगधारा थिएटर स्ट्रीमच्या वतीने 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक'चे कुशल दिग्दर्शन केले. यशस्वी सादरीकरणासाठी अभिलाषा आणि अवधूत कुलकर्णी तसेच रंगधारा थिएटरच्या संपूर्ण टीमने प्रयत्न केले.
'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' आणि 'म्हातारी निघाली गाणी म्हणत' ही (International Balnatya Festival) प्रयोगातील गीते सादर होताना प्रेक्षकही त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रकाशयोजना, संगीत, जंगलाचा देखावा, नेपथ्य आणि बालकलावंतांचा उत्साही अभिनय यामुळे प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला.

दिग्दर्शक श्री. प्रकाश फडणीस यांनी प्रयोगाविषयी सांगितले की, या प्रयोगामुळे बालकलावंतांना आंतरराष्ट्रीय रंगमंचावर अभिनय करण्याचा अनुभव मिळाला. तसेच मराठी मातृभाषेवरील प्रभुत्वात भर पडली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे लोककथा आणि सांस्कृतिक परंपरेच्या संक्रमणाचा प्रत्यय घडवणाऱ्या नाट्यप्रयोगासाठी डॉ पृथ्वीराज तौर यांचे विद्यापीठातील अधिकारी व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
यापूर्वी मुंबई परिसरातील क्वेस्ट संस्थेच्या 'गोष्टरंग' उपक्रमांतर्गत डॉ. पृथ्वीराज तौर यांनी भाषांतरित केलेल्या 'हाक' या कथेच्या नाट्यरूपांतराचे महाराष्ट्रभर २०० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्यात आले आहेत. अक्षय शिंपी यांनी या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन केले होते.