'सावित्रीच्या लेकी' महिला समूहाची बैठक उत्साहात
कन्हान (All India Mali Federation) : अखिल भारतीय माळी महासंघ, शाखा–टेकाडी यांच्या वतीने विजय वासाडे यांच्या निवासस्थानी महासंघाचा वर्धापन दिन, महिला आरोग्य शिबिर तसेच "सावित्रीच्या लेकी" महिला समूहाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकात प्रा. डॉ. मनोज होले यांनी अखिल भारतीय माळी महासंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनेची उद्दिष्टे, समाज संघटन आणि सामाजिक प्रबोधनातील कार्य उपस्थितांसमोर मांडले.
वर्धापन दिनानिमित्त (All India Mali Federation) आयोजित महिला आरोग्य शिबिरात वैद्यकीय समुपदेशक दीक्षाताई अंजनकर यांनी "ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती व महिला आरोग्य" या विषयावर मार्गदर्शन केले. स्तन कर्करोगाची लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदानाचे महत्त्व, उपचारपद्धती तसेच मासिक पाळीदरम्यान स्वच्छता याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
यानंतर झालेल्या "सावित्रीच्या लेकी" महिला समूहाच्या बैठकीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, स्त्री-सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच महिला व मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्पही करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष मनोज गणोरकर होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने संघटनेच्या बळकटीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी रवींद्र गणोरकर, पत्रकार किशोर वासाडे, अजय अंजनकर, वसंता फसाटे, मनोज बोराडे, प्रभाकर बोराडे, हेमंत राऊत, अविनाश उमप यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, महिला, युवक-युवती व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या (All India Mali Federation) यशस्वी आयोजनासाठी वर्षा वासाडे,ज्योती वासाडे, माधुरी वासाडे, निता वासाडे,स्वाती होले,प्रगती आकरे, रेशमा मोहाडे .दीपाली टाकळखेडे, विजया बोराडे, अनिता राऊत वैशाली वानखेडे ,निकिता नागतोडे, ममता मोहाडे सारिका वासाडे, उज्वला मोहाडे, स्नेहा मोहाडे, सोनाली मोहाडे आरती मोहाडे, लक्ष्मीकांता मोहाडे , प्रियंका कुरळकर, मोनाली टाकळखेडे , मंदा मोहाडे,मिरा राऊत,वसुंधरा राऊत , प्रणाली कुरळकर, हर्षा कुरळकर तसेच अखिल भारतीय माळी महासंघ, शाखा–टेकाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.