औसा (Pandit Deepak Linge) : औसा येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात येणारा पंडित विष्णू भातखंडे संगीत रत्न पुरस्कार मराठवाड्यातील ज्येष्ठ हार्मोनियम वादक व गुरुवर्य पंडित दीपक लिंगे सर यांना प्रदान करण्यात आला. रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी औसा येथे आयोजित पंडित भातखंडे संगीत समारोहात मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते पंडित लिंगे यांचा गौरव करण्यात आला.
धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये संगीत विभागप्रमुख म्हणून पंडित दीपक लिंगे यांनी तब्बल ३४ वर्षे अध्यापनाची सेवा बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी संगीत विशारद व अलंकार या पदव्या प्राप्त करून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या अनेक शिष्यांनी मुंबई, हैदराबाद, बंगळुरू तसेच सिंगापूर येथे संगीत अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले आहे.पंडित दीपक लिंगे यांनी देशभरातील विविध प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये हार्मोनियमची साथसंगत केली आहे. दिल्ली, चेन्नई, कोलकाता व मुंबई येथील आयआयटीमध्ये आयोजित स्पिक मॅक कार्यक्रमांमध्ये त्यांनी हार्मोनियमची साथसंगत केली आहे. तसेच लखनऊ, भोपाळ, इंदूर व अलाहाबाद येथील आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांच्या विविध सांगीतिक कार्यक्रमांत त्यांनी हार्मोनियम वादन केले आहे.
साथसंगतीच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी पंडित राजन-साजन मिश्रा, पंडित बसवराज राजगुरू, डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, गणपती भट, बेगम परवीन सुलताना, देवकी पंडित, बकुल पंडित आणि डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांसारख्या नामवंत कलाकारांना हार्मोनियमची साथसंगत केली आहे.संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ योगदान, अध्यापनातून घडविलेली संगीताची समृद्ध परंपरा आणि हार्मोनियम वादनातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पंडित दीपक लिंगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल संगीत क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.