स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सहा गुन्ह्यांची उकल
परभणी (Solar cable theft case) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या मोटार व सोलार केबल चोरीच्या मालिकेतील एका फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून १ लाख ७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्या कबुलीजबाबावरून जिल्ह्यातील सहा चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १६ जून रोजी शहरात चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी साखला प्लॉट परिसरात फरार आरोपी गोरासिंग गुरुबच्चनसिंग दुधानी (रा. साखला प्लॉट, परभणी) हा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी साखला प्लॉट येथील मारोती मंदिर परिसरात सापळा रचून सायंकाळी सुमारे ५.१० वाजता आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने त्याचे साथीदार सोनुसिंग राजुसिंग जुन्नी व कालुसिंग बिन्नासिंग टाक (दोघेही रा. साखला प्लॉट, परभणी) यांच्यासह पूर्णा, दैठणा, ताडकळस, चुडावा व चारठाणा परिसरात मोटार व सोलार केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पूर्णा, ताडकळस, चुडावा, चारठाणा आणि दैठणा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण सहा चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १ लाख ७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दैठणा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे तपासी अधिकारी करीत आहेत. (Solar cable theft case) सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक परिहार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश भुजबळ, पोलीस हवालदार नेताजी गित्ते, पोलीस हवालदार हुसेन खान व चालक पोलीस शिपाई साने यांच्या पथकाने केली.