स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींसह Schedule 4 नियमांचे उल्लंघन; 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान 14 आस्थापनांवर कारवाई, 56.36 लाखांचा खाद्यसाठा जप्त
पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत द न्यू पूना क्लब लिमिटेडवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कॅम्प परिसरातील क्लबच्या स्वयंपाकघराची तपासणी करताना अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्याने क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
10 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत पुणे FDA विभागाकडून विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहीम राबवण्यात आली. पुणे शहर तसेच जिल्ह्यातील विविध खाद्य आस्थापनांची तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात आली. एकूण 14 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, लेबलिंगमधील त्रुटी, दिशाभूल करणारी माहिती आणि भेसळीचा संशय यांसह विविध कारणांमुळे 56.36 लाख रुपयांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला.
द न्यू पूना क्लबच्या किचनमध्ये गंभीर त्रुटी
FDA अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत द न्यू पूना क्लबच्या स्वयंपाकघरातील स्वच्छता व्यवस्थेबाबत अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. तपासणीदरम्यान जिवंत झुरळे आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आला. याशिवाय अन्नसुरक्षा नियमांमधील Schedule 4 मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे FDA ने नमूद केले.
स्वयंपाकघरातील परिस्थितीत उंदराची विष्ठा, साचलेले पाणी आणि तेलकट पृष्ठभाग आढळल्याची माहिती देण्यात आली. तसेच फ्रीजजवळ असलेल्या शौचालयाच्या स्वच्छतेबाबतही गंभीर त्रुटी आढळल्या. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या निकषांचे पालन होत नसल्याचे तपासणीत समोर आल्याने FDA ने कारवाई केली.
अन्न तयार होणाऱ्या ठिकाणच्या या परिस्थितीचा सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंध असल्याचे FDA अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यानुसार द न्यू पूना क्लबचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
पुण्यातील विविध भागांमध्ये FDAची तपासणी
या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यातील दौंड, मंचर, हडपसर, मोहम्मदवाडी, शिरूर, कॅम्प, वानवडी आणि कोंढवा या भागांमध्ये खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
द न्यू पूना क्लबव्यतिरिक्त मिठाई दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरी आस्थापनांचाही तपासणी मोहिमेत समावेश होता. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या काही ठिकाणी अन्न परवाने निलंबित करण्यात आले, तर काही आस्थापनांमधून संशयास्पद किंवा नियमबाह्य खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या पार्श्वभूमीवर पुणे FDA विभागाची ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.