मुख्य मार्गांवर अतिरिक्त ४०० कॅमेरे; कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून २४ तास मॉनिटरिंग, संशयित व्यक्ती व वस्तूंवर AI अलर्ट
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत केली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण मिरवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. शहरात कार्यरत असलेल्या तब्बल ३,५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास निगराणी केली जात आहे. प्रमुख गणेश मंडळे, मिरवणुकीचे मार्ग, महत्त्वाचे चौक आणि गर्दीची ठिकाणे पोलिसांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत.
विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवर सुरक्षेच्या दृष्टीने आणखी ४०० अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे नाईट व्हिजन आणि AI-आधारित तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी घडणाऱ्या विविध हालचालींचे निरीक्षण करण्याबरोबरच संशयास्पद बाबी आढळल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने अलर्ट मिळणार आहे.
कमांड सेंटरमधून संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण
पुणे पोलिसांनी उभारलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून मिरवणुकीच्या मार्गांवरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. गर्दीचा अंदाज घेणे, वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करणे, मार्गावर तैनात असलेल्या पोलिसांना सूचना देणे आणि परिस्थितीनुसार बंदोबस्तात बदल करण्याचे नियोजन याच केंद्रातून केले जात आहे.
एखादी संवेदनशील किंवा संशयास्पद बाब कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित माहिती दिली जाते. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या पथकांना परिस्थितीनुसार जलद प्रतिसाद देता येणार आहे.
AI तंत्रज्ञानातून संशयितांवर नजर
कॅमेऱ्यांमध्ये फेस रेकग्निशनची सुविधा देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा क्राईम रेकॉर्डशी जुळणाऱ्या व्यक्तीची गर्दीत ओळख पटल्यास यंत्रणेकडून ऑटोमॅटिक अलर्ट मिळणार आहे.
कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्यक्तीचा फोटो किंवा व्हिडिओ क्राईमशी संबंधित डेटाशी जुळल्यास त्याच्याशी संबंधित पार्श्वभूमी आणि दाखल गुन्ह्यांची माहिती स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे.
याशिवाय गर्दीच्या ठिकाणी एखादी संशयास्पद वस्तू बेवारस स्थितीत आढळणे, कोणी हत्यार घेऊन फिरणे किंवा ज्वालाग्राही अथवा स्फोटक स्वरूपाची घटना घडणे यासारख्या बाबींचीही AI प्रणालीद्वारे दखल घेतली जाणार आहे. अशा परिस्थितीत कंट्रोल रूमला स्वयंचलित अलर्ट मिळणार आहेत.
क्राईम ब्राँचच्या पथकांना तातडीने माहिती
गर्दीचा फायदा घेत एखादा आरोपी किंवा संशयित व्यक्ती मिरवणुकीत सहभागी झाल्याचे आढळल्यास AI कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याची ओळख पटवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित माहिती व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून क्राईम ब्राँचच्या पथकांपर्यंत तातडीने पोहोचवली जाणार आहे. घटनास्थळी सज्ज असलेल्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पुढील कारवाई करता येणार आहे.
गर्दीची संख्या मोजण्यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर
विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक सहभागी होणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. बेलबाग चौक आणि अलका टॉकीज चौक यांसारख्या संवेदनशील ठिकाणी उपस्थित नागरिकांची संख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोजली जात असून, गर्दीच्या स्थितीवर सातत्याने मॉनिटरिंग केले जात आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि जॉईंट सीपी (सहपोलीस आयुक्त) संजय दराडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीसाठी हे सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. ३,५०० सीसीटीव्ही कॅमेरे, त्यात प्रमुख मिरवणूक मार्गांवरील अतिरिक्त ४०० कॅमेरे आणि AI-आधारित देखरेख यामुळे पुणे पोलिसांनी विसर्जन सोहळ्यासाठी व्यापक तांत्रिक सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे.