कुटुंबीयांना ई-मेल पाठवत तरुणीने घेतला धक्कादायक निर्णय; फुरसुंगी पोलिसांकडून शोध सुरू
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. बीएस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण घेणारी ही तरुणी गुरुवारी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, दिवस उलटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेत असतानाच आई, भाऊ आणि लहान बहिणीला तिचा ई-मेल मिळाला. या ई-मेलमधून तिने एका तरुणासोबत निघून जात असल्याची माहिती दिली.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राहणारी ही तरुणी एका खासगी कॉलेजमध्ये बीएस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली. मात्र, बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सुरुवातीला त्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणी तसेच नातेवाइकांकडे चौकशी केली. परिसरातही तिचा शोध घेण्यात आला; मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
दरम्यान, तरुणीने आपल्या आई, भावाला आणि बहिणीला ई-मेल पाठवल्याचे समोर आले. आपण एका तरुणासोबत निघून जात असल्याचे तिने या मेलमध्ये नमूद केले आहे. संबंधित तरुणाला एड्स असल्याची माहिती असूनही त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने ई-मेलमध्ये लिहिले आहे.
हा ई-मेल मिळाल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलगी नेमकी कुठे गेली आहे, तिच्यासोबत असलेला तरुण कोण आहे आणि ती सध्या सुरक्षित आहे का, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही.
अखेर चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून २२ वर्षीय तरुणीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.