१९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे
उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांचे नागरिकांना आवाहन
रिसोड (Risod Assembly Constituency) : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा कालावधी ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आला असून, या मोहिमेदरम्यान नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती तसेच नाव वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत.
नागरिकांच्या सुविधेसाठी रिसोड व मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील मतदान केंद्रावर चार दिवसीय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत संबंधित मतदान केंद्रांवर पार पडणार आहे. या शिबिरादरम्यान नवीन नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुना-६, तर नावात अथवा पत्त्यात दुरुस्ती करण्यासाठी नमुना-८ भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावा.
या (Risod Assembly Constituency) मोहिमेदरम्यान विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (BLA) केंद्रावर उपस्थित राहून सहकार्य करावे, तसेच रिसोड व मालेगाव परिसरातील सर्व नागरिकांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे.