डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संस्थाचालक संजीव सोनवणे यांचे निधन; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
लातूर : शिक्षण क्षेत्रासाठी ओळख असलेल्या लातूर शहरात मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. सिताराम नगर परिसरातील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संस्थाचालक संजीव सोनवणे (वय ६५) यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
लातूरमधील ट्युशन एरियातील सिताराम नगर परिसरात डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या संस्थेचे प्रमुख म्हणून संजीव सोनवणे कार्यरत होते. मूळचे औसा तालुक्यातील मोगरगा गावचे भूमिपुत्र असलेले सोनवणे हे लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील परिचित नाव होते.
सोनवणे यांनी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सढळ मदत केली होती. विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्थाही त्यांनी स्वतःकडे करून अनेकांना पुढील शिक्षणासाठी सक्षम केले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ते मोठा आधार होते. त्यांच्या निधनामुळे या विद्यार्थ्यांचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
संजीव सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेशी संबंधित विविध बाबींचा तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सोनवणे यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.