मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सेनगाव (Sengaon Dry Drought) : पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके धोक्यात आल्याने सेनगाव तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी ता. ९ रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पावसाअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली.
यासोबतच शेतीसाठी अडचणीचे ठरणारे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवावे, सुकळी तलाव प्रकल्प रद्द करावा, पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास काँग्रेसच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, ज्येष्ठ नेते सुरेशअप्पा सराफ, शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे, विनायकराव देशमुख, डॉ. निळकंठ गडदे, बंटीभैया नागरे, रामेश्वर हेन्द्रे, एकनाथ शिंदे, संतोष पोले, जुबेर देशमुख, भारत कोटकर, अझर देशमुख, राजू स्वामी, सचिनअप्पा शेरकर, गुलाबअप्पा हेन्द्रे, शिवराज पाटील मरडे, शंकर देशमुख, लखन खेडेकर, दिनकरराव गडदे, भीमराव गडदे, सुधाकर बिरगड, माधवराव बिरगड, शुभम गडदे, शंकर गडदे यांच्यासह, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.