दुपारच्या सत्राऐवजी सकाळी शाळा भरवण्याची मागणी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उष्णतेचा परिणाम होत असल्याचा दावा
मॉन्सूनच्या परतीनंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उष्ण आणि कोरडे हवामान जाणवत आहे. वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळेत बदल करून त्या सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवले आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारच्या सत्रात शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असल्याचे वैभव नाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या परिस्थितीचा त्रास होत असल्याने शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने शाळांच्या वेळेत बदलाची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण नसल्याने आणि उन्हाचा कडाका वाढत असल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दुपारच्या वेळी शाळा भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाढलेल्या उष्णतेचा थेट सामना करावा लागत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा देण्यासाठी शाळांचे वेळापत्रक बदलून सकाळच्या सत्रात वर्ग घेण्यात यावेत, अशी मागणी नाईक यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबईतही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज
दरम्यान, मुंबई आणि परिसरातही उष्णतेचा प्रभाव वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतीय हवामान विभागाने एका दिवसापूर्वी मुंबईत पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती.
गेल्या काही दिवसांत मुंबईतील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान दमट आणि तीव्र उष्ण हवामान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
दरम्यान, ७ ऑक्टोबरपासून मुंबई आणि ठाण्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा तीव्र सूर्यप्रकाश आणि रात्री तुलनेने सौम्य गारवा यामुळे वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाली असून, तापमान आणि आर्द्रतेतील बदलाचा शरीराच्या तापमान नियंत्रण यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.