मानोरा (ST Reservation Andolan) : राज्यातील बंजारा समाज हा अति मागासलेला असून ९ गोर बंजारा युवकांनी मागणी केलेल्या एसटी (अनुसूचित जमाती) आरक्षण संदर्भात लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी कायदेशीर व शांततापूर्ण मार्गाने संतनगरी पोहरादेवी काशीत उपोषणाचा आंदोलन लढा उभारला आहे. शासनाने बंजारा समाजाच्या मागणीकडे लक्ष केंदीत करून न्याय देण्याची मागणी करत आंदोलनकर्त्याच्या उपोषणाला दि. १५ सप्टेंबर रोजी भेट देऊन जाहीर पाठींबा दर्शवत माजी आ. अनंतकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी आ. पाटील यांनी एसटी आरक्षणाशी संबंधित तांत्रिक, घटनात्मक आणि कायदेशीर बाबींवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सरकार दरबारी आपल्या मागण्या कशा पद्धतीने मांडल्या पाहिजेत आणि या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी पुढील रणनीती कशी असावी, याबाबत त्यांनी मोलाचा सल्ला दिला. समाजाच्या हक्काची लढाई लढताना संयम आणि एकजूट राखणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले.
आंदोलकामध्ये (ST Reservation Andolan) त्यांच्या या भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे आंदोलकांमध्ये एक नवा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबुसिंग नाईक, कारंजा लाडचे तोताराम राठोड आदीसह परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.