तिरूपती नगर उद्यान

साहेब...एसी सोडून तिरूपती नगराच्या उद्यानात फेरफटका मारा!

Tirupati Nagar Garden: तिरुपती नगर परिसरातील गार्डनच्या देखभाल-दुरुस्ती अभावी सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत व काटेरी झुडपे वाढली असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

साहेब...एसी सोडून तिरूपती नगराच्या उद्यानात फेरफटका मारा!

Tirupati Nagar Garden

 

नागरिकाचे ११०० रुपयांचे आव्हान

कळमनुरी (Tirupati Nagar Garden) : तिरुपती नगर परिसरातील गार्डनच्या देखभाल-दुरुस्ती अभावी सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत व काटेरी झुडपे वाढली असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील वर्षी सुमारे लाखो रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या गार्डनची सध्या दुरवस्था झाली असून नगरपालिका मुख्याधिकारी ने या गार्डनमध्ये एकदा फिरून पहावे त्यांना अकराशे रुपये बक्षीस देण्यात येईल असे नागरिकांकडून जाहीर करण्यात आले.

शहरातील तिरुपती नगर गार्डन (Tirupati Nagar Garden) परिसरात सुमारे चार ते पाच फुटांपर्यंत गवत वाढले असून, त्यामुळे लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी व खेळण्यासाठी जाणे कठीण झाले आहे. या परिसरात मोठे साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या ओपन जिममधील साहित्याचीही मोडकळीस आलेली अवस्था असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गार्डनमध्ये बांधण्यात आलेल्या हॉलचीही पावसाळ्यात गळती होत असल्याची तक्रार असून, हॉलचा दरवाजा जीर्ण झाल्याने तो पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या सुविधांच्या देखभालीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

सध्या याच हॉलमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असून, त्यासाठी लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. गणपती महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, हॉलच्या आजूबाजूला वाढलेले गाजर गवत व अस्वच्छतेमुळे कार्यक्रम कसा घ्यायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता विनोद बांगर यांनी मुख्याधिकारी यांनी आपले वातानुकूलित कार्यालय सोडून एकदा तिरुपती नगरातील गार्डनमध्ये प्रत्यक्ष फेरफटका मारून परिस्थिती पाहावी, असे आव्हान केले आहे. गार्डनची सद्यस्थिती मुख्याधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहून दाखविल्यास ११०० रुपयांचे बक्षीस देऊ, अशी उपरोधिक भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

टैग्स: Tirupati Nagar Garden