विषारी दारूचे मृत्यूकांड उघड; उरळी कांचनमध्ये निर्मिती, फुगेवाडीत मिथेनॉलची भेसळ अन् पुणे-पिंपरीत २२ बळी

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात विषारी दारू प्राशनामुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विषारी दारूचे मृत्यूकांड उघड; उरळी कांचनमध्ये निर्मिती, फुगेवाडीत मिथेनॉलची भेसळ अन् पुणे-पिंपरीत २२ बळी

Toxic Liquor Tragedy

पुणे (Toxic Liquor Tragedy) : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात विषारी दारू प्राशनामुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासात विषारी दारूची निर्मिती, त्यामध्ये मिथेनॉलची भेसळ आणि त्याचे वितरण याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही हजार रुपयांच्या नफ्यासाठी आरोपींनी अनेकांच्या जीवाशी खेळ केल्याचे तपासातून उघड झाले आहे.

या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राजू प्रजापती, योगेश वानखेडे आणि कर्नलसिंग तख्तसिंग विरखा या मुख्य आरोपींना अटक केली आहे. तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार संपूर्ण रॅकेट नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते.

उरळी कांचनमध्ये हातभट्टीची दारू तयार

तपासानुसार, उरळी कांचन येथील राजू प्रजापती उर्फ राधेश्याम प्रजापती यांच्या अड्ड्यावर सुरुवातीला हातभट्टीवर देशी दारू तयार करण्यात येत होती. कुजलेला गूळ आणि उसाच्या मळीपासून ही दारू बनवली जात होती. नशा वाढविण्यासाठी त्यामध्ये नवसागर, युरिया आणि ऑक्सिटोसिनसारख्या रसायनांची भेसळ केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

योगेश वानखेडे हा नियमितपणे राजू प्रजापती याच्याकडून देशी हातभट्टी दारू खरेदी करत होता. अधिक नफा कमावण्यासाठी दारूची नशा वाढविण्याचा त्याने कट रचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

बनावट आधारकार्डच्या आधारे मागवला मिथेनॉल

काही दिवसांपूर्वी योगेश वानखेडे याने मोबाईलवर इथेनॉल आणि मिथेनॉलबाबत माहिती शोधली. त्यानंतर त्याला मुंबईतील REX इंटरनॅशनल कंपनीकडून मिथेनॉल पुरवठ्याबाबत संदेश प्राप्त झाला.

कंपनीने जीएसटी क्रमांक आणि आधार कार्डची मागणी केल्यानंतर योगेश वानखेडे याने मांजरी येथील एका दुकानातून प्रदीप शर्मा या नावाने बनावट आधार कार्ड तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.

२९ एप्रिल २०२६ रोजी त्याने व्हॉट्सअॅपद्वारे २१५ लिटर मिथेनॉलची ऑर्डर दिली. यासाठी मित्राच्या खात्यातून १७ हजार ५०० रुपये ऑनलाइन भरले.

भोसरीतून खडकीपर्यंत मिथेनॉलची वाहतूक

९ मे २०२६ रोजी २१५ लिटर मिथेनॉलचा साठा भोसरी येथील एसीपीएल ट्रान्सपोर्ट (अविनाश कार्गो) गोडाऊनमध्ये पोहोचला. तेथून योगेश वानखेडे याने हा साठा ताब्यात घेऊन पोर्टर सेवेच्या माध्यमातून खडकी रेल्वे स्टेशनसमोरील कल्पेश अग्रवाल यांच्या ताडीच्या दुकानात पोहोचवला.

फुगेवाडीत तयार झाली मृत्यूची दारू

त्यानंतर योगेश वानखेडे याने राजू प्रजापती याच्याकडून प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेचे देशी हातभट्टी दारूचे पाच कॅन आणले. त्यामध्ये पाणी मिसळून दारूचे प्रमाण वाढविण्यात आले.

तपासानुसार, २३ मे रोजी ५० लिटर मिथेनॉल या दारूमध्ये मिसळण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तपासात कर्नलसिंग विरखा उर्फ सरदारजी, त्याची पत्नी इंदरजित विरखा आणि मुलगा गुरुचरण उर्फ विक्की विरखा यांनी फुगेवाडी येथील घरातच बाहेरून आणलेल्या दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचे समोर आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वितरण

२५ मे रोजी मिथेनॉल मिश्रित दारूचे पाच कॅन फुगेवाडी येथील कर्नलसिंग विरखा याच्याकडे विक्रीसाठी देण्यात आले. तसेच सहा कॅन हडपसर येथील आकाश जाधव याला आणि एक कॅन दापोडी येथील इरफान उर्फ पप्पू कुरेशी याला विक्रीसाठी पुरविण्यात आला.

त्यानंतर ही विषारी दारू फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि परिसरातील ग्राहकांपर्यंत पोहोचली. काही दिवसांतच अनेकांना त्रास होऊ लागला आणि मृत्यूंची मालिका सुरू झाली.

मृतांमध्ये समान लक्षणे

तपासात मृतांमध्ये समान लक्षणे आढळून आली आहेत. मळमळ, उलट्या, तोंडाला फेस येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक दृष्टी कमी होणे किंवा जाणे अशी लक्षणे दिसून आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार मिथेनॉल शरीरात गेल्यानंतर सर्वप्रथम डोळ्यांच्या नसांवर परिणाम करतो. त्यानंतर यकृत आणि मूत्रपिंड निकामी होतात. अखेरीस हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो.

उरळी कांचनमध्येही पोहोचले मृत्यूचे लोण

विषारी दारूमुळे उरळी कांचनमध्येही एक बळी गेला आहे. उमेश अवचर (वय ३२) या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याला दृष्टी कमी होणे, मळमळ, हायपरटेन्शन आणि तोंडातून फेस येणे अशी लक्षणे होती. दोन दिवसांपूर्वी त्याने उरळी कांचन परिसरातील दारू गुत्त्यावरून दारू प्यायल्याचे समोर आले आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

दापोडी आणि फुगेवाडी परिसरात संशयास्पद मृत्यू वाढल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

२२ अधिकारी-कर्मचारी निलंबित

या प्रकरणानंतर मोठी प्रशासकीय कारवाईही करण्यात आली आहे. आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांकडून हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित करण्यात आले आहे. तर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथक प्रमुख आणि अन्य चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, विषारी दारूच्या निर्मिती आणि वितरण साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत असून तपासाचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी

पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला ‘मफलर’ नेत्याचा पर्दाफाश करण्याची घोषणा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा; 10 ऑक्टोबरला VSR कंपनी आणि ‘मफलर’ नेत्याबाबत पुरावे मांडणार.

Sep 28, 2026