उदगीर तालुक्यातील ३६ लॅपटॉप कार्यालयात जमा; २१ सप्टेंबरपासून संपूर्ण कामकाजावर बहिष्काराचा इशारा
उदगीर (Udgir Agriculture Department) : उदगीर तालुक्यातील कृषी विभागाचे ऑनलाइन कामकाज ठप्प झाले असून, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन कामासाठी देण्यात आलेले ३६ लॅपटॉप कृषी कार्यालयात जमा केले आहेत. कृषी विभागाच्या मंजूर आकृतीबंधाबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने पुकारलेल्या आंदोलनात तालुक्यातील कृषी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार कृषी विभागातील (Udgir Agriculture Department) संचालक आणि महासंघाच्या प्रतिनिधींची आकृतीबंधाबाबत १० सप्टेंबर रोजी बैठक झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत मंजूर पदसंख्येच्या मर्यादेतच बदल सुचविण्याची भूमिका संचालकांनी मांडली. मात्र, क्षेत्रीय पातळीवरील मंजूर पदसंख्या अपुरी असल्याचे महासंघाच्या प्रतिनिधींनी वारंवार निदर्शनास आणूनही त्याच भूमिकेचा पुनरुच्चार झाल्याने बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
त्यानंतर आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्यातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी आपापले लॅपटॉप कार्यालयात जमा केले. तालुक्यातील ३६ लॅपटॉप कृषी कार्यालयांमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वालकुंदे यांनी दिली. त्यामुळे कृषी विभागाच्या ऑनलाइन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
मंजूर आकृतीबंध रद्द करण्याचा आदेश तातडीने काढावा, यासह विविध मागण्यांसाठी कृषी महासंघाने आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य न झाल्यास २१ सप्टेंबरपासून संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात कृषी विभागाचे कामकाज आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.