कार्यकाल संपल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश; विस्तार अधिकाऱ्यांकडे कारभार
हणमंत केंद्रे
उदगीर (Udgir Gram Panchayat) : उदगीर तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपुष्टात आल्याने त्यांच्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होतीा.त्या प्रशासकाचा सहा महीण्याचा कालावधी २३ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला होता. त्या कालावधी संपुष्टात आलेल्या ५८ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने हा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना (भा.प्र.से.) यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५६ मधील कलम १५१ (१) तसेच शासनाच्या ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची नियुक्ती जास्तीत जास्त सहा महिन्यांसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे.
नियुक्त प्रशासकांनी संबंधित ग्रामपंचायतीचा तातडीने पदभार स्वीकारून शासनाच्या निर्देशानुसार कामकाज पाहायचे आहे. विशेष म्हणजे प्रशासकांना ग्रामपंचायतीच्या कामकाजात मतदानाचा अधिकार राहणार नाही. तसेच मूळ पदाची जबाबदारी सांभाळून प्रशासक म्हणून अतिरिक्त कामकाज पार पाडावे लागणार आहे.या प्रशासकामध्ये(आरोग्य विस्ताराधिकारी), बी.एस. भांगे (कृषी विस्ताराधिकारी), एम.टी. वाघमारे (आरोग्य विस्ताराधिकारी), व्ही.आर. दंडे (पंचायत समिती विस्ताराधिकारी), एम.पी. जाधव (विस्ताराधिकारी), एस.पी. पाटील (कृषी विस्ताराधिकारी), एन.एस. लोहकरे (शिक्षण विस्ताराधिकारी), बी.डी. आरणे (विस्ताराधिकारी) आणि व्ही.व्ही. अजने (कृषी विस्ताराधिकारी) यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायतनिहाय प्रशासक
एस.एम. थोटे : अव्वलकोंडा, मांजरी, सुमठाणा, तादलापूर, वागदरी.
पी.के. खटके : आडोळवाडी, डांगेवाडी, धोंडी हिपरगा, हंगरगा, मल्लापूर.
बी.एस. भांगे : आर्सनाळ, एकुर्का रोड, हकनाकवाडी, हिप्परगा दावड, इस्मालपूर, कुमदाळ हेर.
एम.टी. वाघमारे : बामणी, जानापूर, कोदळी, कौळखेड, पिंपरी, रुद्रवाडी, एनकी.
व्ही.आर. दंडे : भाकसखेडा, गंगापूर, हेर, करडखेल, करवंदी, किणी यल्लादेवी.
एम.पी. जाधव : चिघळी, धडखनाळ, होनीहिप्परगा, करखेली.
एस.पी. पाटील : चांदेगाव, कासराळ, कुमठा खुर्द, निडेबन, वाडवणा खुर्द, डाऊळ.
एन.एस. लोहकरे : डोंगरशेळकी, दावनगाव, हंडरगुळी, जकनाळ, कुमदाळ (उ.), मादलापूर, नळगिर.
बी.डी. आरणे : गुरदाळ, लोहारा, माळेवाडी, शिरोळ, टाकळी.
व्ही.व्ही. अजने : हाळी, क्षेत्रफाळ, खेर्डा खुर्द, लिंबगाव, वाडवणा बु.
या नियुक्तीनंतर संबंधित ग्रामपंचायतींचा दैनंदिन प्रशासकीय कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू राहणार आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी प्रशासकराज आल्याने ग्रामस्थांच्या विकासकामांना आणि स्थानिक प्रश्नांना प्रशासकीय यंत्रणा किती गती देते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.