उमरगा मराठा आंदोलन

मराठा आंदोलकांनी तहसीलदाराची खुर्ची जाळली

Umarga Maratha Agitation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास उमरगा तहसील कार्यालयात धुडगूस घातल्याची घटना घडली.

मराठा आंदोलकांनी तहसीलदाराची खुर्ची जाळली

Umarga Maratha Agitation

 

उमरगा येथील घटना; तहसीलदारांच्या कक्षात घुसून शिपायाला धक्काबुक्की

उमरगा (Umarga Maratha Agitation) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास उमरगा तहसील कार्यालयात धुडगूस घातल्याची घटना घडली. तहसीलदारांच्या कक्षात बळजबरीने प्रवेश करून शिपायाला धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांची खुर्ची कार्यालयाबाहेर आणून आवारात जाळत मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ 'एक मराठा लाख मराठा' , मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासह आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी काही मराठा आंदोलक उमरगा तहसील कार्यालयात आले. त्यांनी तहसीलदार गोविंद येरमे यांच्या कक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेले शिपाई राम शिंदे यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यानंतर आंदोलकांनी तहसीलदारांच्या कक्षात घुसून त्यांची खुर्ची बाहेर आणली आणि तहसील कार्यालयाच्या आवारात खुर्ची आणून पेटवून दिली.

यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसह जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकांपैकी अण्णासाहेब गोविंद पवार, महादेव गोविंद माने, विठ्ठल दशरथ पवार (रा. नाईचाकूर) आणि वैजनाथ आबा काळे (रा. माडज) या चौघांना ताब्यात घेतले.
घटनेनंतर महसूल विभागातील तलाठी व कर्मचारी मोठ्या संख्येने उमरगा पोलीस ठाण्यात दाखल झाले. तहसीलदार गोविंद येरमे यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांची भेट घेत संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत चर्चा केली. दरम्यान, आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

चार जणांना घेतले ताब्यात!
"या घटनेतील चार आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी हा प्रकार केल्याचे फोटो व व्हिडिओ उपलब्ध असून, त्याआधारे संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल," 
-प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, उमरगा पोलीस ठाणे 

कायदेशीर कार्यवाही सुरू
 "या बेकायदेशीर कृत्याची प्रशासनाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे."
- गोविंद येरमे, उमरगा तहसीलदार.