गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पाठपुराव्याला यश; २०० एकर जागा आणि ४४६ पदांना मंजुरी
वर्धा (Wardha SRPF Training Centre) : विदर्भातील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) सर्व गटांसाठी वर्धा येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला मिळालेली ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. गृह विभागाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. या प्रशिक्षण केंद्रासाठी सुमारे २०० एकर जागा उपलब्ध असून, जागा हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी, वर्धा यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. इमारत बांधकामाचा खर्च वगळता केंद्रासाठी सुमारे ३४ कोटी ७ लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
४४६ पदांमुळे रोजगाराच्या संधी
केंद्रासाठी विविध संवर्गातील ४४६ पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात गट-अमधील ५३, गट-बमधील १८, गट-कमधील २२१ आणि गट-डमधील १३० पदांचा समावेश आहे. याशिवाय २४ पदे कंत्राटी अथवा बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत. या (Wardha SRPF Training Centre) केंद्रामुळे थेट रोजगारासोबतच हॉटेल, खानावळ, वाहतूक, किरकोळ व्यापार, सेवा आणि पुरवठा क्षेत्रालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. विविध जिल्ह्यांतून अधिकारी व प्रशिक्षणार्थी वर्ध्यात येणार असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेतही वाढती उलाढाल होऊ शकते.
पायाभूत सुविधांनाही चालना
केंद्रासाठी ४६ वाहनांची तरतूद असून कार्यालयीन साहित्य, संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध केली जाणार आहे. प्रशासकीय व निवासी इमारती तसेच अन्य पायाभूत सुविधांची उभारणीही करण्यात येणार आहे. एसआरपीएफचे मोठे प्रशिक्षण केंद्र वर्ध्यात उभारले गेल्याने जिल्ह्याचे राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील महत्त्व वाढणार आहे. केंद्रामुळे परिसरातील रस्ते, वीज, पाणी, वाहतूक आणि अन्य नागरी सुविधांच्या विकासालाही अप्रत्यक्ष चालना मिळू शकते.
वर्ध्यातील हे प्रशिक्षण केंद्र (Wardha SRPF Training Centre) केवळ पोलीस प्रशिक्षणाची सुविधा नसून रोजगार, व्यवसाय, सेवा क्षेत्र आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय वर्धा जिल्ह्यासाठी दूरगामी परिणाम करणारी मोठी उपलब्धी ठरली आहे.