रिसोड (Yeldari Dam Water Supply Scheme) : रिसोड शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, रिसोडकरांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी येलदरी धरणातून स्वतंत्र अतिरिक्त पाईपलाईन टाकण्यास मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी स्वीकृत नगरसेवक तथा सेवानिवृत्त नगरपरिषद अभियंता बाळासाहेब देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जलसंपदा विभागाच्या २८ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार (क्र. १०९४/२२/(५६६/९४) ल.पा-२), आडोळ प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देताना प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा १५.०२७ दशलक्ष घनमीटर (दलघमी) निश्चित करण्यात आला होता. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी २.९९७ दलघमी आरक्षणाची मर्यादा ठेवण्यात आली होती. या प्रकल्पावर आधीच रिसोड शहरासाठी २.६०२ दलघमी, शिरपूर योजनेसाठी ०.२११ दलघमी, शेलगाव (०.०४६ दलघमी), रिठद (०.०४६ दलघमी), वाघी (०.०३४ दलघमी), खंडाळा शिंदे (०.०३० दलघमी), आशा विविध योजना (०.०३४ दलघमी) आणि ताकतोडा ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे आरक्षण मंजूर आहे. त्यातच तामशीसाठी ०.१२० दलघमी आणि रिसोड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी आणखी १.३३६८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
आडोळ प्रकल्पावर वाढता ताण
मूळ २.९९७ दलघमी आरक्षणाच्या मर्यादेच्या तुलनेत सद्यस्थितीत हे आरक्षण तब्बल ४.७२७८ दशलक्ष घनमीटरवर पोहोचले आहे. त्यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता केवळ आडोळ धरणावर विसंबून राहणे भविष्यात पाणीटंचाईला आमंत्रण देणारे ठरेल, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.
येलदरी धरणाचा पर्याय आवश्यक
शहरास भविष्यात नियमित व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासाठी येलदरी धरणावरून थेट रिसोडपर्यंत स्वतंत्र अतिरिक्त पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा. ३ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार मंजूर योजना कायम ठेवून, येलदरी योजनेला तत्त्वतः मंजुरी द्यावी; तसेच आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, सविस्तर प्रकल्प अहवाल व प्रशासकीय कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागास द्यावेत, अशी मागणी बाळासाहेब देशमुख यांनी केली आहे.
येलदरी धरण पाणीपुरवठा योजना
रिसोड शहरासाठी येलदरी धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर करा; बाळासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Yeldari Dam Water Supply Scheme: रिसोड शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, रिसोडकरांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी..
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Yeldari Dam Water Supply Scheme