Yawatmal :- वंजारी फैल रहिवासी तथा शववाहिनीवर चालक म्हणून असणार्या मांत्रिकाला विभक्त राहणारी महिला बळी पडली. उपचारासाठी तिला मांत्रिकाने स्वतःच्या घरातच डांबले. त्या महिलेच्या १४ वर्षीय मुलीवरही अघोरी (Aghori) उपचार केला.गेल्या सात महिन्यापासून सुरू असलेला हा प्रकार शेजारच्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती दिली.त्यावरून शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी धाड टाकून पीडित महिला व मुलीची सुटका केली.
उपचाराच्या नावाखाली महादेव नीतूवर अघोरी कृत्य
महादेव परशुराम पालवे उर्फ माऊली असे या मांत्रिकाचे नाव आहे. तो एका ट्रस्टच्या शववाहिनीवर चालक म्हणून काम करतो. महादेवकडे उपचारासाठी नीतू रामप्रसाद जयस्वाल रा. बाजीरावनगर दिग्रस ही महिला येत होती. तिच्यासोबत तिची मुलगी होती. नंतर महादेवने त्या महिलेला संमोहित करून स्वतःच्या घरी ठेवून घेतले. नीतू सोबत तिची मुलगीही महादेवच्या घरी राहू लागली. उपचाराच्या नावाखाली महादेव नीतूवर अघोरी कृत्य करू लागला. नंतर त्याने नीतूची मुलगी आजारी असल्याचे सांगून तिच्यावरही हे उपाय सुरू केले. महादेव दोन्ही मायलेकींना चटके देत होता, बेदम मारहाण करीत होता, एका पडक्या खोलीत दोघींना रात्रंदिवस डांबून ठेवले होते. महादेव मनात आले तरच जेवण देत असे. कित्येक दिवस उपाशी राहिल्याने दोघी मायलेकी अशक्त झाल्या.
उपाशी असलेल्या मुलीने एकाच वेळी सात पोळ्या फस्त केल्या
अघोरी पूजा व उपचार करणार्या महादेवच्या (Lord Shiva)मागील दोन दिवसात हालचाली वाढल्या. त्याने स्वतःच्या घरातच देव्हार्याच्या बाजूला मोठा खड्डा खोदला.आज दुपारच्या सुमारास महादेवची हालचाल शेजारच्या एका महिलेला संशयास्पद वाटली. तिने समोरील खिडकुन झाकून पाहिले असता,हा प्रकार तिच्या निदर्शनास आला.तिने याची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यावरून शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान तेथील दृश्य पाहून पोलिसांनाही धक्काच बसला.पोलिसांनी दोन्ही मायलेकींना पोलीस ठाण्यात आणले. महादेवच्या तावडीतून नीतू व तिच्या मुलीची पोलिसांनी सुटका केली. अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने त्यांनी जेवण मागितले. शेजारी नागरिकांनी त्यांना जेवू घातले. यावेळी उपाशी असलेल्या मुलीने एकाच वेळी सात पोळ्या फस्त केल्या. यावरून त्यांचे किती हाल करण्यात आले, याची कल्पना येते.रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अमावश्या असल्याने नीतूच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांना आहे.