पाणीपुरवठा प्रकल्पासाठी २० कोटींचा निधी मंजूर
पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शन कामाला गती मिळणार
पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शन कामाला गती मिळणार
भंडारा (Water supply project) : केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाची सन २०२१-२२ वर्षापासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा सरोवरांचे पुनरुज्जीवन व हरीत क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत (Bhandara Municipal Council) भंडारा शहरात पाणीपुरवठा योजनेचे (water supply project) काम मागील पाच-सहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र निधीअभावी पाणीपुरवठ्याचे कामे रखडले होते.
अद्यापही पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शन, अशी कामे शिल्लक असल्याने शासनाची पाणीपुरवठा योजना केवळ शहरवासियांसाठी दिवास्वप्न ठरत होती. भंडारा नगरपरिषदेचा पाणी पुरवठा प्रकरण शासन दरबारी दाखल झाल्याने (Bhandara Municipal Council) भंडारा नगरपरिषदेला पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शन या कामाकरीता २०.१२ कोटी रुपये पाणी पुरवठा प्रकल्पाला शासनाकडून मंजूर करण्यात आले. यामुळे कामाला गती मिळणार असून शासनाकडून सदर पाणीपुरवठा प्रकल्पाची कामे बारा महिन्यात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
अमृत २.० अभियानांतर्गत भंडारा शहरात पाणीपुरवठा (water supply project) व मलनिस्सारणाची कामे हाती घेण्यात आले. भंडारा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मागील पाच-सहा वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. मात्र कामाला गती नसल्याने अजूनही शहरवासियांना कोट्यवधीचा निधी खर्च करुनही पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रात मुबलक जलसाठा उपलब्ध असतांना अर्ध्या भंडार्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. भंडारा शहरातील बसस्थानक परिसर, बडा बाजार, गांधी चौक, मेंढा, चांदणी चौक, शास्त्री नगर, टाकडी, या परिसरात पाणी टंचाईची झळ पोहोचत आहे.
तेथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सुरुवातीपासूनच पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली नाही. मागील तीन वर्षांपासून नगरपरिषदेत प्रशासक राज असल्याने याचा फटका पाणी पुरवठा प्रकल्प कामांवर बसत आहे. नगरपरिषदेची कार्यान्वयन यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या कामाकरीता भंडारा शहरातील रस्त्यांची तोडफोड करण्यात आली. याचा फटका देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या (water supply project) योजनेंतर्गत केवळ पाणी फिल्टर प्लांटपासून ते दसरा मैदान पर्यंतची मुख्य पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आले असून सबलाईनचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. तर निधीअभावी पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शन ही कामे रखळली होती. राज्य शासनाने नुकतेच एका आदेशान्वये भंडारा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शन याकरीता २०.१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी निधी वितरीत करतांना प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाने वितरीत निधीच्या प्रमाणात भंडारा नगरपरिषदेने स्वतंत्र बँक खाते उघडून त्यामध्ये निधी ठेवणे अनिवार्य राहील. सदर प्रकल्पासाठी वितरीत केलेला निधी त्याच प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक असून त्याचा वापर इतर प्रयोजनार्थ केल्यास सदर बाब ही गंभीर वित्तीय अनियमीतता समजण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर पाणी पुरवठा प्रकल्प बारा महिन्यात पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला असून ४५ दिवसात सदर प्रक्रीया पूर्ण करण्याचा अल्टिमेटम सुद्धा शासनाकडून देण्यात आला आहे.
प्रकल्पाची किंमत वाढविण्याचा खटाटोप : प्रविण कळंबे
भंडारा शहरात मागील अनेक वर्षांपासून (water supply project) पाणीपुरवठा प्रकल्पाच्या नळ वाहिनीचे काम सुरु असून अद्यापही सबलाईन व पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शनचे काम प्रलंबित होते. पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामाला अधिकार्यांची उदासिनता कारणीभूत असून नगरपरिषदेचे कार्यान्वित यंत्रणा कुचकामी ठरत आहे. शहरालगत मुबलक जलसाठा असूनही नगरवासियांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याने मागील पाच-सहा वर्षांपासून काम कासवगतीने सुरु आहे. शहरातील अनेक भागात आज परिस्थिती, पाण्याची समस्या अजूनही भेडसावत आहे. कोट्यावधीचा निधी खर्च होऊनही शहरवासियांना पाणी उपलब्ध होऊ शकला नाही, हे एक शहरवासियांचे दुर्दैव आहे.
यावरुन केवळ (Bhandara Municipal Council) नगरपरिषदेचा पाणी पुरवठा (Water supply project) प्रकल्पाची किंमत वाढविण्याचा नगरपालिका प्रशासनाचा खटाटोप असल्याचा आरोप युवा सेना जिल्हा संघटक प्रविण कळंबे यांनी केला असून शासनाने मंजूर केलेल्या २०.१२ कोटी निधीतून पाण्याचे मीटर व घरगुती नळ कनेक्शन तत्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. वर्षभरात शहरवासियांना पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे, याकरीता कामाला गती देऊन पाणीपुरवठा प्रकल्पाबाबत उदासिन असलेल्या अधिकार्यांवर तसेच कार्यान्वित यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यता यावी, अशी मागणी युवा सेना जिल्हा संघटक प्रविण कळंबे यांनी दिला आहे.