Samudrapur :- तालुक्यातील जाम रस्त्यावरील रेनकापुर येथील जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेजवळ कार समोर खड्डा आल्याने कारची दुचाकीशी जबर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार मोठा भाऊ ठार झाला तर लहान भाऊ गंभीर जखमी झाला. सदर घटना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे झाल्याने बांधकाम विभागावरच (Construction Department) गुन्हा नोंद करावा, अशी नागरिकांनी मागणी करीत रोष व्यक्त केला.
रेनकापुर येथील घटना, खड्ड्यांमुळे अपघात घडल्याने नागरिकांचा बांधकाम विभागावर संताप
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी साडेचार वाजताच्या सुमारास सोहम कंठीराम कोसारे व जखमी नयन कंठीराम कोसारे दोघेही राहणार समुद्रपूर हे दोघे भाऊ डोंगरगड येथील मॉ बमलेश्वरीचे दर्शन घेऊन दुचाकी ने जाम कडून समुद्रपूरला येत होते. समुद्रपूरकडून जामकडे जात असलेल्या कार च्या चालकाने रेनकापुर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ कारच्या समोर आलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कारने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मोठा भाऊ सोहम कंठीराम कोसारे याचा जागीच मृत्यू झाला. लहान भाऊ नयन कंठीराम कोसारे (वय १६) गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रविंद्र रेवतकर, घनश्याम लांडगे, जोती राऊत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून दोन्ही दुघर्टनाग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली. यासंबंधी समुद्रपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.