हिंगोली(Hingoli):- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अधुनमधून कोम्बींग ऑपरेशन (combing operation) राबविले जाते. १५ व १६ जूनला राबविलेल्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये नाकाबंदी करून संशयीत आरोपींची धरपकड केली.
ऑपरेशनमध्ये नाकाबंदी करून संशयीत आरोपींची धरपकड
१५ व १६ जून रोजी जिल्ह्यातील तेराही पोलिस ठाणे (Police Station)हद्दीमध्ये पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, मारोती थोरात, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काशिदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, नरेंद्र पाडळकर, गणेश राहिरे, भोसले, तांबे, कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, गजानन बोराटे, सुनील गोपीनवार, विलास चवळी, राम निरदोडे, विजय रामोड, रवी हुंडेकर, अरूण नागरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठूबोणे यांच्यासह पोलिस ठाण्यातील दुय्यम पोलिस अधिकारी व कर्मचारी झाले होते.
पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी करू वाहनांची तपासणी करण्यात आली
या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण ५२ ठिकाणी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार (criminal)अशा ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली. तसेच जिल्ह्यातील मोक्का, फरार व तडीपार झालेल्या आरोपींचीही तपासणी केली. न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स काढूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नसलेल्या अटक वारंटमधील नॉन बेलेबल वारंट ६, बेलेबल वारंट ७ समन्स बजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील तेराही पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी करू वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या आढळून आलेले वसमत शहरातील बसस्टॅण्डवर (bus stand) आनंदा मधुकर गवळी रा.अशोकनगर वसमत, कळमनुरी शहरातील लमानदेव पाण्याच्या टाकीजवळ शंकर तोलबा खिल्लारे रा.निमटोक, कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील चाचा चहाच्या हॉटेलच्या बाजूला अविनाश हरीदास पवार रा.दाभडी हे संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गोवंशाची कत्तलीसाठी कुठेही अवैध वाहतूक (illegal transportation) होणार नाही या दृष्टीने पोलिसांच्यावतीने पेट्रोलिंग करण्यात आली.