चंद्रपूर (Chandrapur) :- ताडोबा बफर विभागातील मुल वनपरिक्षेत्राच्या (Forest area) कंपार्टमेंट क्रमांक ३६० येथे आज दि. २० जून रोजी वाघीणीचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात (Forest Department) खळबळ उडाली आहे. या वाघिणीचे वय अंदाजे ७ वर्षे आहे.
वनविभागाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळ सुरक्षित केले
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळ सुरक्षित केले व आवश्यक कार्यवाही सुरू केली. मृत वाघिणीचा मृतदेह ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलवण्यात आला. तेथे तपशीलवार शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार मृत्यूचे कारण तीव्र हृदय व श्वसन विकृती असे निदान करण्यात आले आहे. शवविच्छेदनादरम्यान सर्व अवयव — दात, नखे, मिशा इत्यादी सुस्थितीत आढळून आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शिकारीचा अथवा घातपाताचा संशय नाही. संपूर्ण कार्यवाही राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यात आली. यावेळी एनटीसीए (NTC)प्रतिनिधी बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदकर, ताडोबा बफर विभागाचे (Tadoba Buffer Zone) सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. डुबे, डॉ. रवीकांत खोब्रागडे, डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ. कडुकर तसेच पेंडोर, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुल आणि मुल रेंज व ताडोबा बफर विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते .