Yawatmal murder :- उमरखेड तालुक्यातील धनज गावात उसन्या पैशाच्या वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोफाळी पोलीस स्टेशनने (police station) आरोपी किसन सोनबा वाळके (वय ४५, रा. धनज) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत गुन्हा (Crime) नोंदवण्यात आला आहे.
कुर्हाडीने देवरावच्या डोक्यावर वार करून केली हत्या
पोलीस उपनिरीक्षक सुरेश विठ्ठलराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी आडद गावातील शेतशिवारात एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, मृतकाच्या डोक्यावर कुर्हाडीने मारल्याच्या जखमा आढळल्या. मृतकाची ओळख देवराव ग्यानबा वाळके (४५), रा. धनज अशी झाली. मृतकाचा मुलगा करण वाळके याने वडिलांचे नाव पुष्टी केली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह(Dead body) पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला. वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर जखम असल्याचे नमूद करण्यात आले. तपासात करण वाळके याने सांगितले की, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी किसन वाळके हा त्याच्या वडिलांसोबत शेतातील झोपडीवर आला होता.
तपासादरम्यान किसनने कबुली दिली की, मृतक देवराव याने उसनवारीचे १५,००० रुपये परत न केल्याने वाद विकोपाला पोहचला त्यामुळे १९ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याने कुर्हाडीने देवरावच्या डोक्यावर हल्ला करून खून केला. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे करीत आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.