जिंतूर शहरातील मौलाना आझाद कॉलनी येथील घटना!
परभणी (Burglary) : परभणीच्या जिंतूर शहरातील बलसा रोड परिसरातील मौलाना आझाद काॅलनीत मध्यरात्री अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी घरफोडी करत रोख 50 हजार रुपये, व सोनं-चांदीचे दागिने लंपास केले. तसेच, खैरी प्लॉट परिसरातही चोरीचा (Theft) प्रयत्न करण्यात आल्याची घटना दि. 16 जुन रोजी उघडकीस आली आहे. मौलाना आझाद कॉलनी येथील रहिवासी इम्रान खान खाजा खान पठाण हे आपल्या कुटुंबासह लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत घर बंद असल्याचे लक्षात घेऊन चोरट्यांनी (Thieves) मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील दोन्ही खोल्यांची कुलपे तोडून कपाटे उघडली व पलंगाखालील व कपाटातील रोख रक्कम तसेच दागिने (Jewelry) चोरून नेले. चोरीदरम्यान, चोरट्यांनी घरात देशी दारू प्यायली असून, दारूच्या बाटल्या व ग्लास घराबाहेर फेकले. पत्नीची पर्सही नाल्यात टाकण्यात आली होती. यामुळे घरातील वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत सापडल्या.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
या घटनेनंतर चोरट्यांनी खैरी प्लॉट परिसरातील उद्धव काजळे-पाटील यांच्या घराजवळील रूममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. उध्दव काजळे-पाटील यांची खोली कुलूपबंद असतानाही ते शेजारील घरात झोपले होते. अचानक कुलूप (Lock) तोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आपल्या मोठ्या भावाला फोन करून माहिती दिली. वरील मजल्यावरून पाहणी केल्यानंतर, चोरटे दिसून आले. आरडाओरड करताच चोरटे घटनास्थळावरून फरार झाले. नेमकी चोरी किती रकमेची झाली हे पोलिस फिर्याद दाखल झाल्यानंतर समजू शकेल. परभणीच्या जिंतूर शहरात यापूर्वीही अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या असून, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी (Police) घटनास्थळी प्राथमिक भेट देऊन तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.