पुणे (Teachers work online) : राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर वाढत असलेल्या ऑनलाइन आणि अशैक्षणिक कामांच्या अतिरिक्त बोजाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या कामांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप करीत शिक्षकांनी असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 डिसेंबरपासून अध्यापनात अडथळा ठरणारी ऑनलाइन कामे न करण्यासह प्रशासकीय व्हॉट्सॲप समूहांतून बाहेर पडण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.
पुण्यातील शिक्षक भवन येथे आयोजित राज्यस्तरीय बैठकीत सुमारे 15 शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आंदोलनाचा निर्णय घेतला. (Teachers work online) ऑनलाइन माहिती भरणे, विविध शैक्षणिक उपक्रमांचे अहवाल सादर करणे तसेच सातत्याने येणाऱ्या प्रशासकीय सूचनांमुळे शिक्षकांचा बराच वेळ खर्च होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची भूमिका शिक्षक संघटनांनी मांडली.
आवश्यक ऑनलाइन कामे सुरू राहणार
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय कोंबे यांनी या (Teachers work online) आंदोलनाची माहिती दिली. आंदोलनादरम्यान अध्यापनात अडथळा आणणारी अशैक्षणिक ऑनलाइन कामे आणि प्रशासकीय सूचना पाळल्या जाणार नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांशी थेट संबंधित असलेली आवश्यक ऑनलाइन कामे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण विभागाकडून चर्चेची तयारी
दरम्यान, शिक्षकांच्या ऑनलाइन कामांचा (Teachers work online) आणि प्रत्यक्ष अध्यापनाचा समतोल राखण्यासाठी शिक्षण विभागाने मध्यममार्ग काढण्याची तयारी दर्शविली आहे. शिक्षक संघटनांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग कोणता निर्णय घेतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.