हॉस्पिटलमध्ये पुन्हा जुळली मैत्रीची गाठ!
परभणी (Friendship Reunion) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथील रहिवासी भास्कर काळे आणि त्यांची बालपणीची मैत्रीण आरती निधाळकर यांचं नातं म्हणजे खर्या अर्थाने मैत्री किती अढळ, निर्मळ आणि वेळेपलीकडची असते याचं उदाहरण ठरलं आहे. तब्बल 35 वर्षांनी पुन्हा एकदा या दोघांची भेट झाली, ती देखील अगदी अनपेक्षितपणे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात!
न ढळणाऱ्या नात्याचं जिवंत उदाहरण!
भास्कर काळे हे वैद्यकीय उपचारांसाठी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात दाखल झाले होते. 35 वर्षांपूर्वीची शाळकरी मैत्रीण असलेल्या आरती निधाळकर यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी वेळ न दवडता सरळ रुग्णालयात धाव घेत भास्कर काळे यांची भेट घेतली. रुग्णालयातील शांत वातावरणात उपचार घेत असलेल्या भास्कर काळेंच्या खोलीत आरती निधाळकर पोहोचल्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांनी गेलेल्या या दोन मित्र मैत्रिणीची ही अनपेक्षित पण मनापासूनची भेट झाली. त्या क्षणी जणू काळ स्वतः थबकला. 35 वर्षांची तुटलेली मैत्रीची (Friendship) साखळी पुन्हा एकदा जुळली. दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. क्षणभर सर्व आजार, वेदना, चिंता हरवून गेल्या. दोघांनीही मास्क घातलेले असतानाही डोळ्यांतून आणि भावनेतून ओसंडून वाहणारा तो आनंद स्पष्ट दिसत होता. या हृदयस्पर्शी क्षणाचा एक फोटो त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी टिपला आणि तो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. काही तासांतच हा फोटो चर्चेचा विषय बनला. मैत्रीचे नाते कधीच जुने होत नाही हे या फोटोमधून पुन्हा सिद्ध झाले. काळ बदलतो, ठिकाणं बदलतात, जबाबदाऱ्या वाढतात पण बालपणीची मैत्री ही आयुष्यभराच्या आठवणींच्या कप्प्यात कोरून ठेवलेलीच असते. आरती निधाळकर आणि भास्कर काळे यांची भेट हेच दर्शवते की नातं हे मनामनात असतं त्याला वेळ, अंतर, परिस्थिती तोडू शकत नाही. हा प्रसंग केवळ त्यांच्यासाठी नव्हे, तर अनेकांसाठी प्रेरणादायक (Inspirational) ठरतो आहे. मैत्रीच्या या अमर धाग्याला सलाम.